CoronaVirus News : ऑक्टोबर ठरणार सुपरहिट! कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट; मृत्यूचा आकडाही 587 वर
By हेमंत बावकर | Published: October 20, 2020 11:30 AM2020-10-20T11:30:24+5:302020-10-20T11:32:05+5:30
CoronaVirus News : आरोग्य मंत्रालयानुसार २२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये 20,000 हून कमी कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये 50000 हून अधिक रुग्ण सापडत आहेत.
नवी दिल्ली : देशातील कोरोना व्हायरसच्या प्रकोप हळूहळू कमी होताना दिसू लागला आहे. मंगळवारी गेल्या 24 तासांत देशभरात सापडलेल्या नव्या रुग्णांच्या आकड्यात जवळपास 9 हजार रुग्णांच घट झाली आहे. हा मोठा दिलासा मानला जात आहे.
सध्या उत्सवाचे दिवस आहेत. यामुळे दुर्लक्ष केल्यास कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. आज देशात 46,791 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यानंतर पहिल्यांदाच एवढे कमी रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आजच्याघडीला 7,48,538 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजवरची कोरोना रुग्णांची एकूण संख्या 75,97,064 झाली आहे. अॅक्टिव्ह केसमध्येही मोठी घट झाली आहे. कालच्या तुलनेत आज 23,517 रुग्ण कमी आहेत. तर गेल्या 24 तासांत 587 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा सलग दुसरा दिवस आहे जिथे मृत्यूंची संख्या 600 पेक्षा कमी झालेली आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार कोरोनाचे सर्वाधिक पेशंट असलेली 5 राज्यांमध्ये अॅक्टिव्ह केस कमी झाले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूचा ट्रेंड दाखविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आकडा गेल्या आठवड्यापासून कमी होताना दिसत आहे. तर कर्नाटक आणि केरळमध्ये सप्टेंबर शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
India reports 46,791 new #COVID19 cases & 587deaths in last 24 hours.
— ANI (@ANI) October 20, 2020
Total cases - 75,97,064
Active cases - 7,48,538 (dip by 23,517 since y'day)
Cured/discharged/migrated - 67,33,329 (rise by 69,721 since y'day)
Deaths - 1,15,197 (rise by 587 since y'day) pic.twitter.com/RbEE0X39WN
देशात कोरोना व्हायरसमुळे एकूण 1,15,197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 69,721 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 67,33,329 झाली आहे. हा आकडा एकूण रुग्णसंख्येच्या 88.6 टक्के आहे.
सोमवारची आकडेवारी
आरोग्य मंत्रालयानुसार २२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये 20,000 हून कमी कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये 50000 हून अधिक रुग्ण सापडत आहेत. आयसीएमआरनुसार (ICMR) 18 ऑक्टोबरपर्यंत कोरोनासाठी एकूण 9,50,83,976 चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी 8,59,786 चाचण्यांची तपासणी रविवारी करण्यात आली. हरियाणामध्ये गेल्या साडेचार महिन्यांत पहिल्यांदाच एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी 952 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यानुसार हरियाणामध्ये एकूण 1,640 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट येणार
दरम्यान, लवकरच देशात कोरोनाची दुसरी लाट येईल, असा धोक्याचा इशारा नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला आहे. हिवाळ्यात कोरोनाची लाट येऊ शकते, अशी भीती पॉल यांनी व्यक्त केली. देशातल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या टीमचं नेतृत्त्व व्ही. के. पॉल यांच्याकडे आहे. 'गेल्या तीन आठवड्यांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाणदेखील कमी झालं आहे. अनेक राज्यांमधील स्थिती नियंत्रणात आली आहे,' अशी माहिती पॉल यांनी दिली.