धक्कादायक! क्लास बंक केला म्हणून शिक्षकाने दिली शिक्षा; उठा-बशा काढताना विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:37 AM2023-11-23T11:37:58+5:302023-11-23T11:50:42+5:30
शिक्षकाने चार विद्यार्थ्यांना क्लास बंक केल्याची शिक्षा म्हणून उठा-बशा काढण्याचे आदेश दिले.
ओडिशातील एका सरकारी शाळेत शिक्षकाने शिक्षा म्हणून उठा-बशा काढायला लावल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जाजपूर जिल्ह्यातील आहे. रुद्र नारायण सेठी हा ओरली येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेचा विद्यार्थी होता. वर्गात क्लास सुरू असताना विद्यार्थी वर्गाच्या बाहेर जाऊन शाळेच्या परिसरात आपल्या चार मित्रांसोबत खेळत होता. ते शिक्षकाने पाहिलं होतं.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, शिक्षकाने चार विद्यार्थ्यांना क्लास बंक केल्याची शिक्षा म्हणून उठा-बशा काढण्याचे आदेश दिले. याच दरम्यान रुद्र नावाचा मुलगा जमिनीवर पडला. रसूलपूर ब्लॉकजवळील ओरली गावातील रहिवासी असलेल्या त्याच्या पालकांना घटनेची माहिती देण्यात आली. मुलाला त्याच्या कुटुंबीयांनी आणि शिक्षकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात नेलं.
आरोग्य केंद्रातून, रुद्रला मंगळवारी रात्री कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. रसूलपूर ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर निलांबर मिश्रा यांनी सांगितले की, त्यांच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. "आमच्याकडे तक्रार आल्यास आम्ही तपास सुरू करू आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर आवश्यक कारवाई करू" असं मिश्रा यांनी म्हटलं आहे.
कुआखिया पोलीस स्टेशनचे आयआयसी श्रीकांत बारिक यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे कोणाकडूनही तक्रार आलेली नाही. मुलाच्या वडिलांनी किंवा शाळेने एफआयआर दाखल केलेला नाही. रसूलपूरचे सहाय्यक गटशिक्षण अधिकारी प्रवंजन पती यांनी शाळेला भेट दिली असून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.