माकडांनी पळवलं 15 दिवसांचं बाळ, विहिरीत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 12:58 PM2018-04-02T12:58:57+5:302018-04-02T13:09:37+5:30
बाळाला मच्छरदाणीच्या आतमध्ये ठेवले होते.
भुवनेश्वर: कटक येथील तलबस्ता गावात रविवारी एक हदयद्रावक घटना घडली. याठिकाणी एका 15 दिवसांच्या बाळाला माकडांनी घरातून पळवून नेले. त्यानंतर जवळच्याच एका विहिरीत या बाळाचा मृतदेह आढळून आला.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी सहा वाजता माकडांनी घरात झोपलेल्या या बाळाला पळवून नेले होते. यावेळी बाळाला मच्छरदाणीच्या आतमध्ये ठेवले होते. माकडांनी ही मच्छरदाणी दूर करून बाळाला उचलले. तेव्हा बाळाच्या आईने माकडांना बघितले आणि आरडाओरडा करायला सुरूवात केली. मात्र, तोपर्यंत बाळाला घेऊन माकडांनी छपरावर उडी मारली आणि जंगलात पसार झाले. या घटनेनंतर वनाधिकारी आणि स्थानिक लोकांची तीन पथकं बाळाला शोधण्यासाठी जंगलात गेली होती. परंतु, बाळाचा थांगपत्ता लागला नाही. अखेर रविवारी सकाळी शेजाऱ्यांच्या 50 फूट खोल विहिरीत बाळाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
मात्र, शेजाऱ्यांनी शनिवारपर्यंत विहिरीत हा मृतदेह नव्हता, असे सांगितले. बाळाला पळवल्याचे समजल्यानंतर आम्ही विहिरीत बघितले होते. तेव्हा आम्हाला विहिरीत काहीच आढळले नाही. आम्ही बहुतेकदा विहिरीवर काहीतरी आच्छादन टाकून ठेवतो, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बाळ माकडांच्या हातातून निसटून खाली विहिरीत पडले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या परिसरात माकडांचा उच्छाद ही नेहमीची समस्या आहे. याबद्दल स्थानिक गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारीही केल्या आहेत. मात्र, त्याची पुरेशी दखल घेतली जात नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.