पदक हुकलं पण मन जिंकलं! भारताच्या भालाफेकपटूवर पैशांचा पाऊस; CM पटनायकांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:00 PM2023-08-29T16:00:11+5:302023-08-29T16:01:16+5:30
world championships 2023 javelin : जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या किशोर जेनानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं.
kishore jena javelin throw : जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिरंग्याची शान वाढवणारा भालाफेकपटू किशोर जेना याला पदक जिंकण्यात अपयश आलं पण त्यानं तमाम भारतीयांच्या मनात जागा केली. या स्पर्धेत किशोरला एकही पदक जिंकता आलं नाही, पण त्यानं पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवलं. खरं तर भारताचे तीन खेळाडू पहिल्या सहामध्ये होते. नीरज चोप्रानेसुवर्ण पदक जिंकले, तर किशोरला पाचव्या आणि डीपी मनूला सहाव्या स्थानावर समाधान मानाव लागलं. पहिल्या पाचपर्यंत मजल मारण्यात यश मिळवणाऱ्या किशोर जेनाला ओडिशा सरकारनं बक्षीस जाहीर केलं आहे.
CM पटनायक यांची घोषणा
किशोर जेनानं केलेल्या कामगिरीमुळं ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्याला २५ लाखांचे रोख बक्षीस जाहीर केलं. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व करणारा किशोर हा ओडिशाचा पहिला खेळाडू ठरला आहे. रविवारी त्यानं जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८४.७७ मीटर भाला फेकला होता. भालाफेकमधील ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली.
भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करत इतिहास रचला. ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि डायमंड लीग चॅम्पियन असलेल्या नीरजने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देखील सुवर्ण पदक जिंकले. लक्षणीय बाब म्हणजे या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे. नीरजनं तब्बल ८८.१७ मीटर भाला फेकून सोन्यावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळं भारताच्या या शिलेदाराला २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
दरम्यान, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ च्या भालाफेक स्पर्धेत १२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज अव्वल राहिला. त्यानं ८८.१७ मीटर भाला फेकून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पाकिस्तानचा अर्शद नदीम दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला ८७.८२ मीटर अंतरापर्यंत भाला फेकण्यात यश आलं. त्यामुळं पाकिस्तानच्या अर्शदला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.