ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचीही झालीय फसवणूक; म्हणाले, "अद्याप पैसे मिळाले नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 17:39 IST2024-12-24T17:38:28+5:302024-12-24T17:39:25+5:30

मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, चिटफंड घोटाळ्यात आपली दोनदा फसवणूक झाली आहे.

Odisha CM Mohan Charan Majhi claimed victim of chit fund scams; said, "I haven't received the money yet" | ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचीही झालीय फसवणूक; म्हणाले, "अद्याप पैसे मिळाले नाहीत"

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचीही झालीय फसवणूक; म्हणाले, "अद्याप पैसे मिळाले नाहीत"

चिटफंड घोटाळ्याचे आपणही बळी ठरल्याचे ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मंगळवारी म्हटले आहे. तसेच, लोकांनी पॉन्झी योजनांबाबत सजग राहून कष्टाने कमावलेला पैसा वाचवण्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. ते राज्यस्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन सोहळ्यात बोलत होते.

मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, चिटफंड घोटाळ्यात आपली दोनदा फसवणूक झाली आहे. 1990 आणि 2002 मध्ये दोन पॉन्झी कंपन्यांनी माझी फसवणूक केली. मी त्या योजनांमध्ये पैसे जमा केले, परंतु जेव्हा मॅच्योरिटीची वेळ आली तेव्हा त्या कंपन्या गायब झाल्या. त्यानंतर फसवणूक झालेले पैसे परत मिळण्याची प्रक्रिया इतकी लांब आणि कठीण होती. त्यामुळे आपण पैसे परत घेऊ शकलो नाही.

पॉन्झी कंपन्यांच्या एजंटांनी दिलेली गोड आश्वासने फसवणूक असल्याचे सांगत मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, एजंट योजना अतिशय आकर्षक पद्धतीने मांडायचे आणि मीही त्यांच्या फंदात पडून गुंतवणूक केली, पण शेवटपर्यंत मला माझे पैसे मिळू शकले नाहीत.

केंद्राच्या प्रयत्नांचे कौतुक केले
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, सध्या परिस्थिती खूप बदलली आहे. चिट फंड घोटाळे थांबवण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यासाठी केंद्राने आता कडक कायदे केले आहेत आणि नियम मजबूत केले आहेत. हे पाऊल ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

कंपन्यांच्या फंदात पडू नका- मुख्यमंत्री
यासोबतच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी आणि पॉन्झी कंपन्यांच्या फंदात पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी केले. तसेच, अशी फसवणूक थांबवण्यासाठी जनजागृती आणि दक्षता आवश्यक आहे. कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित ठेवणे हे आमचे प्राधान्य असले पाहिजे, असेही मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले.
 

Web Title: Odisha CM Mohan Charan Majhi claimed victim of chit fund scams; said, "I haven't received the money yet"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.