गुटखा खाण्यासाठी वडिलांनी दिले नाहीत १० रुपये; मुलाने गळा कापून गाठलं पोलीस ठाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:24 IST2025-03-05T16:24:54+5:302025-03-05T16:24:54+5:30
ओडिशामध्ये वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर मुलाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं.

गुटखा खाण्यासाठी वडिलांनी दिले नाहीत १० रुपये; मुलाने गळा कापून गाठलं पोलीस ठाणे
Odisha Crime: सध्याच्या काळात क्षुल्लक कारणावरुन रागाच्या भरात एखादं भयानक कृत्य घडण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरुन झालेल्या भांडण एखाद्याच्या हत्येपर्यंत येऊन थांबत असल्याचे पाहायला मिळत आहे. ओडिशातही असाच काहीचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. ओडिशामध्ये वडिलांनी १० रुपये दिले नाहीत म्हणून मुलाने त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. आरोपी मुलाने एवढ्यावरच न थांबता वडिलांचे शीर हातात घेऊन थेट पोलीस ठाणे गाठलं आणि हत्येची कबुली दिली. या सगळ्या प्रकारानंतर परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात मुलाने वडिलांचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली. आरोपी मुलाने गुटखा घेण्यासाठी वडिलांकडून १० रुपये मागितले होते. पण वडिलांनी नकार दिल्याने तो संतापला. त्यांच्यातला वाद इतका वाढले की त्याने वडिलांचा खून केला आणि स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
सोमवारी मयूरभंज जिल्ह्यातील चंदुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला. ७० वर्षीय बैधर सिंह हे पत्नी आणि मुलासोबत राहत होते. आरोपी मुलाने त्याचे वडील बैधर सिंह यांच्याकडे गुटखा खरेदी करण्यासाठी १० रुपये मागितले होते. ज्याला बैधर सिंह यांनी नकार दिला. त्यानंतर दोघांमधील भांडण वाढले. मुलगा इतका संतापला की त्याने धारदार शस्त्राने वडिलांचा गळा चिरला. त्यानंतर मुलाने वडिलांचे शीर घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं.
पोलिसांच्या तपासात हत्येपूर्वी आरोपी मुलगा आणि त्याच्या आई-वडिलांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्याने वडिलांची हत्या केली. हत्या झाल्यापासून आरोपीची आई फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीने आत्मसमर्पण केल्यानंतर पोलीस फॉरेन्सिक टीमसह त्याच्या गावी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.