लढाई कोरोनाशी! आईच्या मृत्यूनंतरही 'हा' डॉक्टर मुलगा पोहोचला रुग्णांच्या सेवेवर, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 07:21 PM2020-03-23T19:21:58+5:302020-03-23T19:40:42+5:30
17 मार्चला संबलपूर येथील सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या 80 वर्षीय आई पद्मिनी दास यांचे निधन झाले. मात्र अशा, परिस्थितीतही अशोक दास हे सेवेवर उपस्थित होते. ते जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. राज्ये लॉकडाउन झाली आहेत. रेल्वे पाठोपाठ आता अंतर्गत विमानसेवाही बंद होणार आहेत. लोकांना घरूनच काम करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, असे असतानाच डॉक्टर, पोलीस आणि सफाई कामगार सर्वसामान्यांच्या सेवेसाठी घराबाहेर आहेत. यातच ओडिशातील एक डॉक्टर त्यांच्या आईचे निधन झालेले असतानाही, त्याच दिवशी पूर्ण वेळ रुग्णालयात सेवेवर उपस्थित होते, असे वृत्त आहे.
‘इंडिया टाइम्स‘ने दिलेल्या एका वृत्तानुसार, 17 मार्चला संबलपूर येथील सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या 80 वर्षीय आई पद्मिनी दास यांचे निधन झाले. मात्र अशा, परिस्थितीतही अशोक दास हे सेवेवर उपस्थित होते. ते जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
याच दिवशी डॉ. अशोक यांनी अनेक बैठकांत भाग घेतला. लोकांमध्ये जाऊन त्यांना कोरोनाचा सामना कसा करावा, यासंदर्भात माहिती दिली. एवढेच नाही, तर ते जिल्ह्याच्या मुख्य रुग्णालातही गेले. तेथील परिस्थितीचीही त्यांनी पाहणी केली. यानंतर सायंकाळचे सर्व काम संपवून ते घरी गेले आणि आईवर अंत्यसंस्कार केले. यावर बोलताना डॉ. अशोक म्हणाले, या क्षणी सुट्टीपेक्षाही सेवा म्हत्वाची आहे आणि मीही तेच केले.
एका आयएएस अधिकाऱ्याचे असेच वृत्त समोर आले होते -
यापूर्वी ओडिशातीलच एक आयएएस अधिकारी निकुंज धल यांचेही असेच उदाहरण समोर आले होते. त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. यानंतर ते केवळ 24 तासांतच आपल्या कामावर रुजू झाले होते. त्यांच्याकडे राज्याचे मुख्य सचिव आरोग्य व कुटुंब कल्याणची जबाबदारी देण्यात आलेली आहे. कोरोनाबरोबरच्या या लढ्यात निकुंज आणि अशोक यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे.