ओडिशामध्ये जवानांनी 5 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 10:34 AM2018-11-05T10:34:21+5:302018-11-05T10:58:47+5:30
ओडिशातील मलकानगिरीतील कालीमेडा येथे सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये सोमवारी सकाळी चकमक झाली. यामध्ये पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
भुवनेश्वर - ओडिशामध्ये नक्षलवाद्यांविरोधात चालवल्या जाणाऱ्या मोहीमेत सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. नक्षलग्रस्त भाग असलेल्या मलकानगिरी जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी मलकानगिरी जिल्ह्यातील कालीमेडा परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यादरम्यान, पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरुन जवानांनी 5 हत्यारं आणि एक हँड ग्रेनेड जप्त केले आहे. दरम्यान, परिसरात अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांचा नेता रणदेबचाही खात्मा झाल्याचे म्हटले जात आहे.
दंतेवाडामध्येही झाली होती चकमक
गेल्या आठवड्यात दंतेवाडामध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. दंतेवाडातील अरनपूर पोलीस ठाणे क्षेत्रात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वी बीजापूरमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते.
(म्हणे आम्हाला त्या हत्येचं दु:ख; नक्षलवाद्यांनी जारी केलं पत्र)
#Odisha: Five Naxals were killed in encounter between security forces and Naxals in Malkangiri's Kalimeda, early morning today.
— ANI (@ANI) November 5, 2018
दूरदर्शनच्या कॅमेरामनची हत्या
छत्तीसगढच्या जंगलात दूरदर्शनचे कॅमेरामन अच्युतानंद साहू यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. यानंतर नक्षलवाद्यांनी पत्र जारी केले. साहू वा पत्रकारांशी आपले अजिबात वैर नसून, सुरक्षा दलाच्या जवानांसह ते आले, तर ते मारले जाऊ शकतील, असा इशारा नक्षलवाद्यांनी शुक्रवारी दिला. नक्षलवाद्यांनी एक पत्र प्रसिद्धीस दिले असून, त्यात आमचे पत्रकारांशी काहीच वैर नाही, असे स्पष्ट केले.
सुरक्षा दलाच्या जवानांसह कॅमेऱ्यासह आलेले लोक हे पत्रकारांच्या तुकडीचा भाग आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते. ते सुरक्षा दलाचाच भाग असल्याचे वाटल्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे त्यात म्हटले आहे. अच्युतानंद साहू ज्या ठिकाणी बसले होते, ते पाहून आम्हाला ते पत्रकार आहेत, हे समजले नाही. ते जवानच आहेत, असे आम्हाला वाटले. त्यामुळे त्यांची हत्या झाली असे नमूद करतानाच, त्यांच्या मृत्यूबद्दल नक्षलवाद्यांनी दु:खही व्यक्त केले आहे. तसेच यापुढे पत्रकारांनी वा त्यांच्या तुकडीने सुरक्षा दलाच्या जवानांसह येऊ नये, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. तुम्ही एकटे आलात, तर तुमचे इथे स्वागतच केले जाईल, असे त्यांनी म्हटले.