Draupadi Murmu : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंचे गाव आजही अंधारात; फोन चार्जिंगसाठी जावं लागतं 1 किमी दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 02:10 PM2022-06-26T14:10:48+5:302022-06-26T14:41:47+5:30
Draupadi Murmu : ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील डुंगरशाही हे मुर्मू यांचं मूळ गाव आहे. या गावात आजही वीज नसून साधा मोबाईल चार्ज करण्यासाठी गावकऱ्यांना एक किलोमीटर दूर जावं लागतं.
नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चर्चा करून एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी याबाबत घोषणा केली. तर दुसरीकडे विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान होणार असून २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. याच दरम्यान द्रौपदी मुर्मू यांचं गाव आजही अंधारात असल्याची माहिती आता समोर आली आहे.
ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील डुंगरशाही हे मुर्मू यांचं मूळ गाव आहे. या गावात आजही वीज नसून साधा मोबाईल चार्ज करण्यासाठी गावकऱ्यांना एक किलोमीटर दूर जावं लागतं. तसेच रॉकेलच्या दिव्यावर येथील लोक जगत असल्याचं पाहायला मिळत आहे. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील ऊपरखेडा गावात झाला. सुमारे 3500 लोकसंख्या असलेल्या या गावात बडा शाही आणि डुंगुरशाही या दोन वस्त्या आहेत. बडाशाहीमध्ये वीज आहे पण डुंगरशाहीतील लोक आजही अंधारात जगत आहे.
गावातील नागरिकांना रॉकेलच्या प्रकाशात रात्र घालवावी लागते. तर फोन चार्ज करण्यासाठी एक किलोमीटर दूर जावं लागत आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर होतच डुंगुरशाही हे गाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. या गावाला माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट दिली. त्यावेळी इथं वीज नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर ओडिशा सरकारला जाग आली. सरकारने गावात वीजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे.
द्रौपदी मुर्मू यांचे भाचे बिरंची नारायण टुंडूसह या गावातील 20 कुटुंब आजही अंधारात जगत आहेत. बिरंची हे शेतकरी असून पत्नी आणि दोन मुलांसह या गावात राहतात. या गावातील स्थानिकांनी मुर्मू राष्ट्रपती होण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडं लाईट कनेक्शनसाठी अर्ज केला होता. दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेनुसार या आदिवासी बहुल भागातील बडाशाहीपर्यंत वीज पोहचली आहे, पण डुंगुरशाही वीजेपासून वंचित आहे. या गावातील नागरिकांना द्रौपदी मुर्मू यांचा अभिमान आहे. राष्ट्रपतीची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. यासोबतच गावात अद्याप वीज नसल्याने नाराजीही व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.