दिवसा शिक्षक, रात्री कुलीचं काम...पैशासाठी नव्हे, माणुसकीसाठी काम करणारा 'देवमाणूस'!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 02:08 PM2022-12-12T14:08:53+5:302022-12-12T14:10:15+5:30
शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती मेहनत घेतात, याची काहीवेळा विद्यार्थ्यांना देखील कल्पना नसते.
शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती मेहनत घेतात, याची काहीवेळा विद्यार्थ्यांना देखील कल्पना नसते. शिक्षकांचे एकच उद्दिष्ट असतं ते म्हणजे त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यानं त्यांना मिळालेल्या ज्ञानातून आयुष्यात यश प्राप्त करावं. ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय नागेशू पात्रो देखील याच उद्देशातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. ते एक सामान्य शिक्षक नाहीत, कारण ते विद्यार्थ्यांना तसेच त्याच्या सहकारी शिक्षकांना मदत करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. ही मेहनत केवळ मानसिकच नाही तर शारीरिक देखील आहे.
नागेशू पात्रो हे व्यवसायाने एका खाजगी महाविद्यालयात गेस्ट टीचर आहेत. दिवसा ते कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतात. त्याचवेळी ते रात्री बेरहामपूर रेल्वे स्थानकावर कुली म्हणून काम करतात. कुली म्हणून काम करुन मिळणारे पैसे ते गरीब विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये मोफत शिकवण्यासाठी नेमलेल्या शिक्षकांचे पगार देण्यासाठी वापरतात.
दिवस सुरू होताच पात्रो एका खाजगी महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करतात. यानंतर ते गरीब विद्यार्थ्यांसाठी उघडलेल्या कोचिंग सेंटरमध्ये मोफत क्लास घेतात. रात्री तो बेरहामपूर रेल्वे स्थानकावर कुली म्हणून काम करतात.
गरीब मुलांना शिकवण्यासाठी कोचिंग क्लास
"कोविड महामारीच्या काळात घरी बसून राहण्याऐवजी गरीब मुलांना मोफत शिकवायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानं आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग सेंटर सुरू करावं लागलं", असं नागेशू पात्रो म्हणाले. ते स्वतः हिंदी आणि ओडिया विषय शिकवतात, तर उर्वरित विषयांसाठी त्यांनी इतर शिक्षकांची नेमणूक केली आहे. पात्रो त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये इतर चार शिक्षकांना नेमलं आहे, ज्यांना ते सुमारे १०,००० ते १२,००० रुपये मानधन देतात. पण एवढे पैसे देण्यासाठी ते रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करतात.
पगारातून चालवतात घर
स्वत: लेक्चरर झाल्यानंतर कुली म्हणून काम करण्याची लाज वाटते का, असे जेव्हा पात्रो यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, "लोकांना जे वाटतं ते त्यांना विचार करू द्या, मला मुलांना शिक्षण देणं जास्त आवडतं आणि मला गरीब विद्यार्थ्यांना मदत करायची आहे." गेस्ट लेक्चरर म्हणून ते ८,००० रुपये कमावतात. एका खाजगी महाविद्यालयात लेक्चरर असून ते आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी वापरतात.
स्वत:चंही शिक्षण पूर्ण करण्यात आलेल्या अडचणी
पात्रो २००६ साली १०वीच्या परीक्षेला बसू शकले नाहीत, कारण मेंढ्या चरणाऱ्या त्यांच्या वडिलांना दोन दिवस भाकरीची व्यवस्था करणं देखील कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत शिक्षण हे त्यांच्यासाठी दूरचं स्वप्न होतं. तेव्हापासून पात्रो अधिकाधिक मुलांना शिक्षित करण्याच्या मोहिमेत व्यस्त आहे. वंचित पार्श्वभूमीतून येणाऱ्या मुलांनी कुटुंबाच्या आर्थिक समस्यांमुळे अभ्यास सोडावा असं त्यांना वाटत नाही.
पात्रो २०११ पासून रेल्वे स्थानकावर कुली म्हणून नोंदणीकृत आहेत. २०१२ मध्ये त्यांनी १२वीची परीक्षा बाहेरुन अभ्यासक्रमाद्वारे देण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण बर्हमपूर विद्यापीठातून पूर्ण केलं. रात्री कुली म्हणून काम करून कमावलेल्या स्वतःच्या पैशातून त्यांनी सर्व उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. "सध्या लोक ट्रॉली बॅग आणि एस्केलेटर वापरत आहेत, त्यामुळे कुली म्हणून मिळणारी कमाई कमी झाली आहे. रेल्वे स्थानकावर काबाडकष्ट करणाऱ्या कुली समाजासाठी काहीतरी करावं", असंही आवाहन पात्रो यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना केलं आहे.