भारीच! लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली पण 'त्याने' हार नाही मानली; कर्जाने फोन घेऊन लाखोंची कमाई केली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 02:28 PM2021-07-17T14:28:22+5:302021-07-17T14:39:44+5:30
Isak Munda : लॉकडाऊनमध्ये काम गेलेल्या एका तरुणाने युट्यूबच्या माध्यमातून आता लाखोंची कमाई केली आहे.
नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. हातावरचं पोट असणाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आता मिळेल ते काम करायला सुरुवात केली आहे. काहींनी परिस्थितीसमोर हार न मारता नवनवीन मार्ग शोधले आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये काम गेलेल्या एका तरुणाने युट्यूबच्या माध्यमातून आता लाखोंची कमाई केली आहे. तरुण मजुरीचं काम करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत होता. मात्र लॉकडाऊनमुळे काम गेलं. अशावेळी मजुराने एक फोन खरेदी करून कमाल केली आहे.
इसक मुंडा (Isak Munda) असं या मजुराचं नाव आहे. ओडिशातील हा मजूर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या आपल्या एका युट्यूब चॅनेलमधून हा मजूर लाखो रुपये कमावत आहे. इसक मुंडा याचे युट्यूबवर जवळपास साडे सात लाख फॉलोअर्स आहेत. इसक पत्नी, दोन मुली आणि मुलासहित एका झोपडीत राहतो. लॉकडाऊनमध्ये हातचं काम गेल्याने त्याने काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला. याआधी त्याने यूट्यूबवर काही व्हिडीओ पाहिले होते. त्यामुळे त्याला त्यातून प्रेरणा मिळाली. इसक मुंडा याने आपल्या काही मित्रांकडून पैसे उधार घेतले आणि एक स्मार्टफोन विकत घेतला.
मुंडा याने आपल्या दैनंदिन गोष्टी युट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम इसक मुंडा याने भात आणि करी खातानाचा एक व्हिडीओ अपलोड केला होता.त्यांच्या या व्हिडीओला पाच लाख व्ह्यू आहेत. ग्रामीण भागाचा व्हिडीओंना स्पर्श असल्याने अनेकांना ते आवडू लागले. "मी माझ्या गरीब घरात आणि गावात हे व्हिडीओ तयार करतो. आम्ही काय आणि कसं खातो हे लोकांना दाखवतो. माझे व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहेत याचा मला आनंद आहे. मला आता यामधून चांगले पैसे मिळत आहेत" अशी प्रतिक्रिया इसक मुंडा यांनी दिली आहे.
इसक मुंडा आपल्या व्हिडीओंमधून जेवणासोबतच गावातील इतर गोष्टीही दाखवण्याचा प्रयत्न करतात. पहिला व्हिडीओ पोस्ट केल्याच्या तीन महिन्यांनी इसक मुंडा याच्या बँक खात्यात 37 हजार रुपये आले. यानंतर अजून तीन महिन्यांनी पाच लाख रुपये आले. यानंतर इसक मुंडा याच्या युट्यूब चॅनेलचे सबस्क्रायबर्स वाढत गेले. इतर काही युट्यूबर्सनेही त्याला पाठिंबा दिला. त्याने आतापर्यंत 300 व्हिडीओ पोस्ट केले असून जवळपास साडे सात लाख सबस्क्रायबर्स आहेत. इसक मुंडा फक्त पैशांसाठी व्हिडीओ तयार करत नसून यातून जनजागृती करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.