अबब! ७ राज्ये, ६० हजार एकरहून अधिक जमीन; जगन्नाथ पुरी मंदिराच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 07:15 PM2023-10-02T19:15:39+5:302023-10-02T19:20:12+5:30
Lord Jagannath Temple News: ओडिशीतील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
Lord Jagannath Temple News: ओडिशा येथील जगन्नाथ पुरी मंदिर हे देशभरातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. देवाला काही ना काही गोष्टी अर्पण करत असतात. या मंदिराबाबत अनेक अद्भूत गोष्टी सांगितल्या जातात. वास्तुरचनेचा एक अद्भूत नमुना म्हणूनही या मंदिराकडे पाहिले जाते. यातच आता जगन्नाथ पुरी मंदिराच्या संपत्तीबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.
भगवान जगन्नाथ मंदिराच्या संपत्तीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. जगन्नाथ मंदिराकडे ६०,८२२ एकर जमीन आहे. ओडिशासह ७ राज्यांत ही जमीन आहे. बीजू जनता दलाचे आमदार प्रशांत बोहरा यांनी यासंदर्भात एक प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ओडिशाचे कायदामंत्री जगन्नाथ सरका यांनी याबाबत माहिती दिली.
गुजरातसह ६ राज्यांत जगन्नाथ मंदिराच्या नावावर जमीन
ओडिशातील ३० पैकी २४ जिल्ह्यात महाप्रभू जगन्नाथ बीजे, श्री क्षेत्र पुरी यांच्या नावावर ६०,४२६ एकर जमीन आहे. यापैकी ३८,०६१.८९२ एकर जमीन मंदिर प्रशासनाच्या ताब्यात आहे. तसेच, गुजरातसह सहा राज्यांत ३९५.२५२ एकर जमीन जगन्नाथ मंदिराच्या नावावर आहे, असे सरका यांनी सांगितले. तसेच मंदिराच्या जमिनीवर करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून विविध तालुक्यांत ९७४ ठिकाणी तक्रार नोंद केली आहे. जगन्नाथ मंदिर अधिनियम १९५५ च्या कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सरका यांनी दिली.