"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 07:46 PM2024-05-29T19:46:55+5:302024-05-29T19:47:43+5:30

Lok Sabha Election 2024: नवीन पटनाईक यांचा प्रचारसभेतील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत, त्यांची प्रकृती बिघडण्यामागे कुठल्यातरी लॉबीचा हात असल्याचा दावा केला होता. मात्र नवीन पटनाईक (Naveen Patnaik) यांनी नरेंद्र मोदी यांचा दावा खोडून काढला आहे.

Odisha Lok Sabha Election 2024: Naveen Patnaik replied to Prime Minister Narendra Modi's claim, "If my health was not good..." | "तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वी ओदिशामध्ये मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या प्रकृतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नवीन पटनाईक यांचा प्रचारसभेतील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत, त्यांची प्रकृती बिघडण्यामागे कुठल्यातरी लॉबीचा हात असल्याचा दावा केला होता. मात्र नवीन पटनाईक यांनी नरेंद्र मोदी यांचा दावा खोडून काढत माझी तब्येत बरी नसती तर मी एवढ्या उन्हाळ्यात प्रचार करू शकलो नसतो, असं प्रत्युत्तर दिलं आहे.

ओदिशामध्ये सातव्या टप्प्यातील मतदानामध्ये  लोकसभेच्या ६ आणि विधानसभेच्या ४२ जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान, ओदिशामधील एका प्रचारसभेत संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनाईक यांच्या प्रकृतीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. एका वर्षातच नवीन पटनाईक यांची तब्येत कशी काय बिघडली, असा सवाल मोदींनी उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नवीन पटनाईक म्हणाले की, मी नरेंद्र मोदींचा चांगला मित्र आहे. त्यांनी मला केवळ एक फोन तरी करायला हवा होता. माझी तब्येत एकदम चांगली आहे. जर असं नसतं तर एवढ्या उन्हाळ्यात मी प्रचार करू शकलो नसतो. मोदींना वाटत असेल तर माझ्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांची एक समिती बनवून चौकशी करू शकतात. १० वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेवर असलेले भाजपा नेते माझ्या आरोग्यााबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत, असा आरोपही नवीन पटनाईक यांनी केला.

नवीन पटनाईक यांचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये ते एका प्रचारसभेत भाषण देताना दिसत आहेत. मात्र त्यादरम्यान, पटनाईक यांचे हात थरथरताना दिसत आहेत. त्यावेळी बीजेडीचे नेते व्ही.के. पांडियन पटनाईक यांच्या थरथरत्या हातांना कॅमेऱ्यापासून लपवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, ओदिशामधील मयूरभंज येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सध्या नवीनबाबू यांचे सर्व शुभचिंतक चिंतीत आहेत. मागच्या एका वर्षात नवीनबाबू यांची प्रकृती एवढी कशी बिघडली हे पाहून ते त्रस्त झालेले आहेत. अनेक वर्षांपासून नवीनबाबू यांचे निकटवर्तीय मला भेटतात, तेव्हा त्यांच्या प्रकृतीची चर्चाही होते. आता नवीनबाबू यांची प्रकृती बिघडण्यामागे काही कटकारस्थान आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच याबाबत जाणून घेण्याचा ओदिशाच्या जनतेला अधिकार कार आहे. नवीनबाबूंच्या नावाखाली पडद्याआडून ओदिशाची सत्ता चालवत असलेल्या ल़ॉबीचा तर यामागे हात नाही ना? असा प्रश्नही नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थित केला होता.  

Web Title: Odisha Lok Sabha Election 2024: Naveen Patnaik replied to Prime Minister Narendra Modi's claim, "If my health was not good..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.