पावसाचा प्रकोप! ओडिशात वीज पडून 10 जणांचा मृत्यू; 3 गंभीर जखमी, 4 दिवस धोका कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 10:21 AM2023-09-03T10:21:31+5:302023-09-03T10:26:24+5:30
भुवनेश्वर आणि कटक शहरांसह ओडिशाच्या किनारपट्टीच्या शहरांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या काळात सहा जिल्ह्यांत वीज पडण्याच्या घटना घडल्या असून, त्यात जवळपास दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये खुर्दा जिल्ह्यात चार, बोलंगीरमध्ये दोन आणि अंगुल, बौध, जगतसिंगपूर आणि ढेंकनालमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
भुवनेश्वर आणि कटक शहरांसह ओडिशाच्या किनारपट्टीच्या शहरांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. येत्या चार दिवसांत राज्याच्या अनेक भागात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे.
वृत्तसंस्थेनुसार, चक्रीवादळ सर्क्युलेशनने मान्सून सक्रिय झाला आहे. ज्यामुळे संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. भुवनेश्वर आणि कटक या दोन्ही शहरांमध्ये दुपारी 90 मिनिटांच्या कालावधीत अनुक्रमे 12 मिमी आणि 95.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (OSDMA) ने ट्विट करून लोकांना वादळाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले होते.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य बंगालच्या उपसागरावरही चक्रीवादळ कायम आहे. त्यामुळे पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. दक्षिण-पश्चिम मान्सून पुढील चार दिवस येथे सक्रिय राहणार असून, त्यामुळे राज्याच्या विविध भागात पाऊस पडणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.