Odisha Vigilance Raid: पोलिसाच्या घरात सापडलं घबाड, पगाराच्या 500 पट संपत्ती पाहून अधिकारी झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:27 AM2022-02-17T10:27:49+5:302022-02-17T10:28:09+5:30
Odisha Vigilance Raid: पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून 1 कोटींची बीएमडब्ल्यू आणि इतर कारसह 5.3 लाखांची बाईक जप्त करण्यात आली आहे.
भुवनेश्वर: ओडिशाच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मोठं घबाडं सापडलं आहे. भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या कमाईच्या 500 पट संपत्ती जमा केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. छापेमारीदरम्यान पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून बीएमडब्ल्यू कार, स्पोर्ट्स बाईकसह सुमारे 11 कोटींची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मौल्यवान वस्तू जप्त
पोलीस अधिकारी त्रिनाथ मिश्रा यांच्या घरावर विजिलेंस टीमने टाकलेल्या छाप्यात 1 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू एक्स 7 कार, 17 लाख रुपयांची ह्युंदाई क्रेटा कार, मारुती बलेनो, शेवरलेट ट्रेलब्लेझर एलटीझेड कार, 5.3 लाख रुपयांची जीटीआर 250 हायसंग बाइक आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
अनेक भूखंड खरेदी केले
पोलिस अधिकारी त्रिनाथ मिश्रा यांच्या पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावावर अनेक भूखंड असून ते बेकायदेशीरपणे खरेदी करण्यात आल्याचे विजिलेंस विभागाचे म्हणणे आहे. याप्रकरणी विजेलेंस एसपी अक्षय कुमार मिश्रा यांनी सांगितले की, बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधिकारी त्रिनाथ मिश्रा यांच्या घरावर छापा टाकला होता.
बेकायदेशीरपणे मालमत्ता जमवल्याप्रकरणी त्रिनाथ मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ओडिशाच्या विजेलेंस विभागाने भ्रष्ट अधिकार्यांवर कारवाई तीव्र केली आहे. गेल्या दीड महिन्यात 23 सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यात 4 वर्ग-1 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.