MBBS व्हायचं होतं, पण विकावा लागला चहा; आता डॉक्टर घडवण्यासाठी झटताहेत काका!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 03:51 PM2019-09-14T15:51:20+5:302019-09-14T15:58:19+5:30
मी जेव्हा एमबीबीएसची तयारी करत होतो, तेव्हा माझे वडिल गंभीर आजारी पडले होते.
भुवनेश्वर - शहरातील अजय बहादूरसिंग हे गरीब कुटुंबातील 19 विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. एकेकाळी डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहणाऱ्या बहादूरसिंग यांनी गरीब घराण्यातील 19 विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी धडे देत आहेत. वैद्यकीय कॉलेजमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या NEET परिक्षेची तयारी हे काका करुन घेत आहेत. जिंदगी फाऊंडेशनच्या माध्यमातून येथील विद्यार्थीही भविष्यातील डॉक्टरचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत घेत आहेत.
47 वर्षीय सिंग यांनी सुपर 30 नावाने नवीन अभ्यास फॉर्म्युला तयार केला आहे. सुप्रसिद्ध गणिततज्ञ आनंद कुमार यांनी चालवलेला हा सुपर 30 पॅटर्न शिकविण्याचे काम सिंगकाका करत आहेत. गेल्या अनेक परीक्षांमध्ये काकांचा हा सुपर 30 पॅटर्न विद्यार्थ्यांच्या यशाचे गमक बनला आहे. सन 2018-19 च्या बॅचमध्ये 14 विद्यार्थ्यांनी या पॅटर्ननुसार अभ्यास करुन NEET परिक्षा क्रॅक केली आहे. तर, 2018 च्या परीक्षेत 20 पैकी 18 विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. सिंग यांना शिकून डॉक्टर व्हायचं होतं, पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांच हे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. आपलं हे अपूर्ण स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान भेटावे, यासाठी सिंग यांनी जिंदगी फाऊंडेशन नावाने 2017 साली एक संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गरीब तरुणांना मदत करण्याचं काम सिंग करणार आहेत.
मी जेव्हा एमबीबीएसची तयारी करत होतो, तेव्हा माझे वडिल गंभीर आजारी पडले होते. त्यावेळी, आम्ही आमच्याजवळचं सगळ विकलं, मी तर उदरनिर्वाहासाठी चहा विकण्याचं काम हाती घेतलं. त्यामुळेच, माझ्याप्रमाणे परिस्थितीचे चटके बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय मी घेतला. त्यासाठी, मी या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वसतिगृह आणि जेवण यापैकी शक्य ती मदत करतो, असे सिंग यांनी सांगितले. सध्या जिंदगी फाऊंडेशनच्या मदतीने 19 विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत असून आम्ही एक दिवस नक्की डॉक्टर होऊ, असा विश्वास येथील विद्यार्थीनी रेखा रानी हिने बोलून दाखवला. माझे वडिल मजुराचे काम करतात. त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती बिकट असून मी 12 वी पर्यंत सरकारी शाळेत शिक्षण घेतले आहे. आताही, कोचिंग क्लासेसची फी भरण्याची माझी परिस्थिती नाही, म्हणून मी जिंदगी फाऊंडेशनकडे शिक्षण घेते, असे रानी हिने सांगतिले.
दरम्यान, ओडिशा ही माझी कर्मभूमी आहे, त्यामुळे मी येथूनच जिंदगी फाऊंडेशनला सुरुवात केल्याचं सिंग यांनी सांगितल. तर, भविष्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.