पुतिनला 'दहशतवादी' म्हणणाऱ्या खासदाराचा भारतात संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या..?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 03:39 PM2022-12-27T15:39:22+5:302022-12-27T15:39:46+5:30
ओडिशातील रायगडमध्ये दोन रशियन पर्यटकांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हे दोघे मित्र असून, यातील एक रशियन खासदार होते.
ओडिशातील रायगडमध्ये दोन रशियन पर्यटकांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका रशियन पर्यटकाचा मृत्यू झाला तर दोन दिवसांपूर्वीच त्याचा मित्रही मृतावस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी सांगितले की, 65 वर्षीय पावेल अँथोम शनिवारी हॉटेलबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पावेलचा सहप्रवासी व्लादिमीर बिदेनोव 22 डिसेंबर रोजी त्याच हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले होते.
मृतापैकी एक रशियन खासदार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत रशियन पर्यटकांपैकी एक पावेल अँटोनोव्ह हा रशियन खासदार असून, ते राष्ट्राध्यक्ष पुतीनचे कट्टर टीकाकारही होते. या घटनेला हा नवीन अँगल जोडल्यानंतर पोलिसही अलर्ट झाले आहेत. पावेल अँटोनोव्ह हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मोठे विरोधक मानले जातात. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तेव्हा अँटोनोव्हने पुतिनला दहशतवादी म्हटले होते. दरम्यान, अँटोनोव्हचा मित्र व्लादिमीर यांचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे.
दोन्ही मित्र नशेत होते
व्लादिमीर आणि अँटोनोव्ह यांच्यासह चार रशियन पर्यटकांनी 21 डिसेंबर रोजी कंधमाल जिल्ह्यातील दरिंगबाडीला भेट दिल्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन केले होते. हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने सांगितले की, पर्यटकांनी दुपारी 4.30 च्या सुमारास चेक इन केले आणि ते सर्व मद्यधुंद अवस्थेत होते. त्यापैकी बी व्लादिमीरचा रात्री मृत्यू झाला. पावेल आणि अँटोनोव्ह एकाच रुममध्ये राहत होता.
मित्राच्या मृत्यूनंतर अँटोनोव्ह दुःखी ?
तपास अधिकारी एसपी विवेकानंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनानंतर व्लादिमीर यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मित्राच्या मृत्यूमुळे रशियन खासदार पावेल अँटोनोव्ह खूप दुःखी होते आणि यातच त्यांनी 25 डिसेंबर रोजी आत्महत्या केल्याचा संशय आहे. तरीदेखील पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहेत.