Odisha Train Accident: रेल्वे दुर्घटनेतील १०० मृतदेहांची ओळख पटेना; एकाच मृतदेहावर अनेक दावेदार, कुटुंबियांची DNA होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 11:42 AM2023-06-06T11:42:42+5:302023-06-06T11:43:45+5:30

रुग्णालयात कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे.

Odisha Train Accident: 100 dead bodies in train accident not identified; There will be DNA of many claimants, families on the same body | Odisha Train Accident: रेल्वे दुर्घटनेतील १०० मृतदेहांची ओळख पटेना; एकाच मृतदेहावर अनेक दावेदार, कुटुंबियांची DNA होणार

Odisha Train Accident: रेल्वे दुर्घटनेतील १०० मृतदेहांची ओळख पटेना; एकाच मृतदेहावर अनेक दावेदार, कुटुंबियांची DNA होणार

googlenewsNext

भुवनेश्वर - ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन ट्रेनच्या भीषण अपघातात २८० बळींपैकी जवळपास १०० जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या दु:खात आणखी वाढ झाली आहे. कुटुंब आपल्या बेपत्ता नातेवाईकांच्या शोधात रुग्णालयाच्या शवागृहात चकरा मारत आहेत. शेकडो छिन्नविछिन्न मृतदेह अजूनही अज्ञात आहेत. शरीराचे काही अवयव आहेत ज्यांवर अनेकांकडून दावा केला जात आहे. मृतदेह कोणाच्या ताब्यात द्यायचा हे राज्य सरकार ठरवू शकले नाही? बिहारच्या भागलपूरमधील दोन वेगवेगळ्या कुटुंबांनी एकाच मृतदेहावर दावा केला आहे. मृतदेहाच्या अवस्थेमुळे ओळखणे कठीण झाले आहे.

आता दावेदारांचे डीएनए नमुने तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर रुग्णालयात कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीएनए मॅच झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यासाठी कुटुंबीयांना बोलावले जाईल. बालासोर तिहेरी ट्रेन दुर्घटनेत बचावकार्य पूर्ण झाले आहे. जखमी प्रवाशांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांना घरी सोडण्यात आले आहे. पण ओडिशा सरकारसमोर मृतदेहांची ओळख पटवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

१७० मृतदेह ताब्यात

ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप कुमार जेना यांनी सांगितले की, बालासोर आणि भुवनेश्वर येथून १७० मृतदेह ताब्यात देण्यात आले आहेत. अनेक जण सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाट पाहत होते परंतु त्यांना अद्याप नातेवाईकांचे मृतदेह सापडले नाहीत. एम्स भुवनेश्वरच्या शवागृहात मृतदेह ठेवण्यात आले आहेत असं ते म्हणाले तर काही मृतदेहांची ओळख पटवण्यात आम्हाला अडचणी येत आहेत कारण मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आहेत आणि चेहरे योग्यरित्या ओळखले जात नाहीत असं भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त विजय अमृता कुलंगे यांनी सांगितले.

'भरपाईसाठी खोटा दावा केला जाऊ शकतो'

पश्चिम बंगालमधील एका वृद्धाने सांगितले की, "आम्ही आमच्या (नातेवाईकांच्या) मृतदेहावर दावा करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाकडे संबंधित कागदपत्रे सादर केली आहेत." मात्र याच मृतदेहावर अन्य कोणीतरी दावा करत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मृतदेह सापडला नाही. अधिका-यांनी सांगितले की काही लोक नुकसान भरपाईमुळे खोटे दावे करू शकतात, त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे.

मृतदेहांसाठी वणवण

बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बासुदेव रॉय यांनी सांगितले की, मी माझ्या भावाच्या आणि दाजीच्या शोधात वेगवेगळ्या रुग्णालयांना भेट देत आहेत. ते कोरोमंडल एक्सप्रेसने प्रवास करत होते. आम्ही आठ मृतदेह शवागृहात ठेवलेले पाहिले पण त्यात माझा भाऊ आणि बहिणीच्या पतीसारखे नव्हते. बंगालमधील पूरबा मेदिनीपूर येथील गोपाल आणि निमाई मन्ना हे दोन भाऊही दुर्दैवी लोकांपैकी एक होते. ते त्यांचा भाऊ समीर,जो कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये पेंट्री कामगार म्हणून काम करायचा त्याचा शोध घेत आहेत. बालासोरमधील रुग्णालयांना भेट दिल्यानंतर त्यांनी सोमवारी एम्स भुवनेश्वर गाठले. येथे त्यांना त्याचा मृतदेह आढळून आला.

ओडिशाचे विकास आयुक्त अनु गर्ग म्हणाले की, राज्य सरकारने प्रत्येक रुग्णालयात आणि प्रत्येक शवागृहात हेल्प डेस्क सुरू केला आहे. अधिकारी पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करत आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याची समस्या सहसा अशा मोठ्या अपघाताच्या घटनेत उद्भवते. परंतु, राज्य प्रशासन रेल्वे आणि भारत सरकारच्या अधिकार्‍यांसह एकत्रितपणे समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. आम्ही त्यांना मृतदेहांची छायाचित्रे आणि विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवाशांची यादी दाखवत आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय पीडितांच्या नातेवाइकांची राहण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Odisha Train Accident: 100 dead bodies in train accident not identified; There will be DNA of many claimants, families on the same body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.