Odisha Train Accident : मोठा स्फोट झाला! घटनास्थळी पोहोचलो, 300 लोकांना बाहेर काढलं; जखमींसाठी 'हा' व्यक्ती ठरला देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 12:51 PM2023-06-03T12:51:44+5:302023-06-03T13:01:13+5:30
Odisha Train Accident : अपघात होताच स्थानिक लोकांनी माणुसकी दाखवत बचावकार्य सुरू केलं. त्यांनी ताबडतोब ट्रेनमधील मुलांना आणि जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि इतर टीम तेथे पोहोचेपर्यंत ते बाहेर काढत राहिले.
ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला आहे तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. अपघातानंतर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, अपघात होताच स्थानिक लोकांनी माणुसकी दाखवत बचावकार्य सुरू केलं. त्यांनी ताबडतोब ट्रेनमधील मुलांना आणि जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि इतर टीम तेथे पोहोचेपर्यंत ते बाहेर काढत राहिले.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्थानिक नागरिक गणेश यांनी सांगितले की, अपघात झाला तेव्हा ते लोक येथून 200 मीटर अंतरावर असलेल्या बाजारात होते. मोठा आवाज ऐकून ते घटनास्थळी पोहोचले. ते म्हणाले की, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आम्ही येथे पोहोचलो तेव्हा अनेक लोक रेल्वेच्या बोगीत अडकले होते. लोकांचं ओरडणं ऐकू येत होतं. त्यांनी आतून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
#BalasoreTrainAccident | "I was nearby when this accident happened, we rescued around 200-300 people," says Ganesh, a local #OdishaTrainAccidentpic.twitter.com/d8PkJNEPRY
— ANI (@ANI) June 3, 2023
गणेशने सांगितलं की, आम्ही ट्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 200 ते 300 लोकांना बाहेर काढलं. अपघातानंतर या तरुणाने स्थानिक लोकांसह युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्यात हातभार लावला. लोक मदतीसाठी आरडाओरड करत होते आणि या सगळ्यात मोठ्या संख्येने स्थानिक लोकांनी ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. स्थानिक लोकांच्या मदतीने लहान मुलं आणि जखमींसह अनेकांना सुखरूप बाहेर काढता आले.
अपघात एवढा होता की लगेच काहीच समजू शकले नाही. प्रथम कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक झाल्याची बातमी आली. त्यानंतर हावडा एक्सप्रेसचीही टक्कर झाली. आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. रेल्वेच्या बोगीत अनेक लोक अडकल्याचं त्यांनी पाहिलं. यानंतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू झालं. ट्रेनमध्ये अडकलेल्या शेकडो लोकांना तातडीने बाहेर काढण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.