Odisha Train Accident: देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे दुर्घटनेच्या ४८ तासांनी 'तो' जिवंत बचावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:13 PM2023-06-06T12:13:09+5:302023-06-06T12:14:56+5:30

ढिगार्‍यातून आता कुणी जिवंत बाहेर येईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती पण असे म्हणतात की ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच चमत्कार या प्रवाशासोबत घडला.

Odisha Train Accident: One person escaped alive after 48 hours of the horrific train accident | Odisha Train Accident: देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे दुर्घटनेच्या ४८ तासांनी 'तो' जिवंत बचावला

Odisha Train Accident: देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे दुर्घटनेच्या ४८ तासांनी 'तो' जिवंत बचावला

googlenewsNext

भुवनेश्वर - ओडिशात शुक्रवारी तिहेरी रेल्वे अपघात झाला. या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला. डब्याच्या ढिगाऱ्याखाली दबून अनेकांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा अजूनही वाढत आहे. त्याचवेळी या घटनेत अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळाली जी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये काही तासांनंतर काही जिवंत सापडले, तर काही अपघाताच्या वेळी दुसऱ्या बोगीत गेल्याने बचावले. आता अपघातानंतर तब्बल २ दिवसानंतर एक प्रवासी जिवंत सापडला आहे. भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत एका झुडपात तो पडला होता त्याला जिवंत बाहेर काढण्यात आले. रूग्णालयात दाखल झालेल्या या प्रवाशाची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

विशेष म्हणजे बचाव कार्यात गुंतलेली १००० जणांची टीम सलगच्या शोधमोहिमेमुळे थकली होती. ४८ तास उलटून गेले होते आणि शोध मोहीम बंद करण्यात आली होती. एक ट्रॅक रेल्वेसेवेसाठी खुला करण्यात येणार होता. तेव्हा अचानक हलणाऱ्या झुडपाकडे पथकाचे लक्ष गेले आणि त्यांनी तिथे जाऊन जखमी व्यक्तीला पाहिले. ढिगार्‍यातून आता कुणी जिवंत बाहेर येईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती पण असे म्हणतात की ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच चमत्कार या प्रवाशासोबत घडला.

कोरोमंडल एक्स्प्रेसची एक बोगी दाट झाडीमध्ये पलटली होती. तेथेच हा प्रवासी झुडपांमध्ये दबला होता. इतक्या भीषण ट्रेन अपघातानंतर ४८ तासांनंतर माणूस जिवंत कसा असू शकतो? याने रेस्क्यू टीम सुद्धा आश्चर्यचकित झाली. बचाव पथकाने सांगितले की, त्या व्यक्तीला सोरो येथील कम्युनिटी सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि तेथून त्याला बालासोर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. आसाममधील ३५ वर्षीय दुलाल मजुमदार असे या व्यक्तीचे नाव आहे.

चार लोकांसह कोरोमंडलमध्ये प्रवास करत होता

दुलालने सांगितले की, मी माझ्या चार सहकाऱ्यांसोबत कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होतो. त्या ४ जणांचे काय झाले माहिती नाही. अपघात झाला तेव्हा आम्ही कोरोमंडल एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात होतो. ट्रेनच्या धडकेनंतर मी उडून झुडपात पडलो असावा असा अंदाज आहे. मी दोन दिवस वाचलो हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. सोमवारी सकाळी दुलाल मजुमदार यांना एम्स भुवनेश्वरमध्ये नेण्यात आले जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुलालच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत. तो अजूनही या दुर्घटनेमुळे शॉकमध्ये आहे.

Web Title: Odisha Train Accident: One person escaped alive after 48 hours of the horrific train accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.