Odisha Train Accident: सिग्नल फेलमुळे अपघात झाला नाही, रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 08:46 AM2023-06-07T08:46:30+5:302023-06-07T08:47:17+5:30
ओडिशातील रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी सुरू आहे.
ओडिशा येथील बालोसोर येथे झालेल्या रेल्वेअपघातात आतापर्यंत २७८ जणांचा मृत्यू झाला. तर ११०० जण जखमी झाले, आता या अपघाताची सीबीआय चौकशी सुरू आहे. अपघाताच्या कारणांवर विभागामध्येच एकमत नाही. बालासोर दुर्घटनेच्या 'संयुक्त तपास अहवाला'वर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी एक वरिष्ठ रेल्वे अभियंता यांनी वेगळे मत नोंदवले आहे. चौकशी अहवालात अपघाताचे कारण सिग्नल बिघाडामुळे झाल्याचे आले आहे, आता आणखी एक अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. या अधिकाऱ्याने 'डेटालॉगर' अहवालाचा हवाला देऊन कोरोमंडल एक्स्प्रेसला मुख्य मार्गावर जाण्यासाठी सिग्नल हिरवा होता, लूप लाइन नव्हता असा दावा केला आहे.
काल सीबीआय पथक चौकशीसाठी ओडिशात पोहोचले आहे. अपघाताची चौकशी सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीच्या टप्प्यावर, वेगवेगळ्या विभागांमध्ये मतभेद असणे अगदी सामान्य आहे कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपास पूर्ण होईपर्यंत अंतिम निकालासाठी वाट पाहावी लागेल, असंही ते म्हणाले.
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेऊन दिल्लीत परतलेल्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत दोन तास बैठक झाली. या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यात त्यांनी कोणतेही बाह्य घटक रेल्वे नेटवर्कशी छेडछाड करू शकणार नाहीत, अशा सूचना दिल्या.
२ जून रोजी, बालासोर, ओडिशात, कोरोमंडल एक्सप्रेस 'लूप लाइन' वर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली, ज्यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसचे बहुतेक डबे रुळावरून घसरले. याचवेळी जाणाऱ्या हायस्पीड बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे काही डबे कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले आणि रुळावरून घसरले. या अपघातात २७८ जणांचा मृत्यू झाला, तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले.
अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू
या घटनेच्या प्राथमिक तपासात फक्त 'सिग्नलिंग सिस्टिम'मध्ये हस्तक्षेपच नाही तर संभाव्य मानवी निष्काळजीपणाही समोर आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.