ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 08:09 PM2024-06-02T20:09:54+5:302024-06-02T20:11:00+5:30
Odisha vidhan sabha Exit polls : लोकसभेसोबतच ओडिशात विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या होत्या. यात भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे.
Odisha vidhan sabha Exit polls : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल समोर आले. यात भाजपच्या नेतृत्वाखालील NDA तिसऱ्यांदा सत्तेत येताना दिसत आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीबरोबर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या. यापैकी सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाचे निकाल आज जाहीर झाले, तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. दरम्यान, एक्झिट पोलनुसार ओडिशात भाजप मोठी मुसंडी मारताना दिसत आहे.
13 मे ते 1 जून या कालावधीत ओडिशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी चार टप्प्यात पार पडल्या. राज्यात लोकसभेच्या 21 जागा असून, येथे तिरंगी लढत होण्याची अपेक्षा होती, परंतु एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर, भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपला ओडिशातील लोकसभेच्या 18-20 जागा मिळू शकतात, तर बीजेडीला 2 आणि इंडिया आघाडीला 1 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच इथे विधानसभेच्या निवडणुकादेखील पार पडल्या. विशेष म्हणजे, गेल्या दोन दशकांहून अधिक काळपासून बीजेडीचा बालेकिल्ला असलेल्या ओडिशात यंदा भाजप मोठी मुसंडी मारताना दिसत आहे.
भाजप-बीजेडीला विधानसभेत किती जागा मिळतील?
ओडिशा विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. सर्वेक्षणानुसार बीजेडी आणि भाजप या दोन्ही पक्षांना 62 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, काँग्रेसला 5-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. ओडिशा विधानसभेत बहुमताचा आकडा 74 जागा आहे. मतांच्या टक्केवारीबाबत झाल्यास, भाजप आणि बीजेडीला 42% मते मिळाली आहेत. या आकडेवारीवरुन बीजेडीला एकहाती सत्ता मिळवता येणार नसल्याचे सिद्ध होत आहे.