'कोब्रा' चावल्यानंतर युवकाने सापाला मारून टाकलं, मग पिशवीत घेऊन थेट हॉस्पिटल गाठलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:45 IST2025-03-16T15:44:18+5:302025-03-16T15:45:34+5:30
जेव्हा अजित कर्मकार उडाला येथील हॉस्पिटलमध्ये पोहचला तेव्हा त्याच्या शरीरात विष पसरण्याचे लक्षण दिसत होते.

'कोब्रा' चावल्यानंतर युवकाने सापाला मारून टाकलं, मग पिशवीत घेऊन थेट हॉस्पिटल गाठलं...
एखादा साप समोर दिसला की भल्याभल्यांची भंबेरी उडते. त्यातच कोब्रासारख्या अतिविषारी सापाने चावल्यानंतर माणूस जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र ओडिशाच्या मयूरभंज येथे घडलेल्या प्रकाराने सगळेच हैराण झाले आहेत. याठिकाणी कोब्रा सापाने एका व्यक्तीला ३ ते ४ चावा घेतला परंतु त्याने न घाबरता त्या सापाला मारलं. त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत मेलेला साप भरून त्याने थेट हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलमध्ये तातडीने त्या व्यक्तीला दाखल करून घेत उपचाराला सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपाल गावातील आहे. येथील अजित कर्मकार नावाचा व्यक्ती घराबाहेर पडला असता त्याला झुडुपात लपून बसलेल्या कोब्रा सापाने दंश दिला. अजित त्याच्या घराबाहेर उभा होता. तेव्हा अचानक कोब्रा सापाने त्याच्यावर हल्ला केला. या विषारी सापाने अजितला ३-४ वेळा सर्पदंश दिला. या हल्ल्यानंतर अजितनेही न घाबरता त्या सापाला मारून टाकले आणि त्यानंतर मेलेला साप प्लॅस्टिक पिशवीत घेऊन तो हॉस्पिटलला पोहचला.
जेव्हा अजित कर्मकार उडाला येथील हॉस्पिटलमध्ये पोहचला तेव्हा त्याच्या शरीरात विष पसरण्याचे लक्षण दिसत होते. सापाने चावा घेतलेल्या जागेवरून रक्त वाहत होते. डोळ्यात विष उतरत होते. अजितची अवस्था पाहून हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले. तो त्याच्यासोबत मेलेला साप घेऊन आला होता. त्याच्या हातातील पिशवी उघडून पाहिली तेव्हा अनेकांना धक्का बसला. त्यांनी मृत साप ताब्यात घेत कर्मकारवर योग्य ते उपचार सुरू केले.
दरम्यान, रुग्णाने त्याच्यासोबत मेलेला साप घेऊन आल्यानंतर त्याला कोब्रा सापाने चावल्याचं कळलं, त्यामुळे त्यासाठी लागणारे उपचार करणं सोपे गेले. तपासणीवेळी आम्हाला त्याच्या शरीरावर कोब्राच्या दाताच्या खूणा सापडल्या. शरीरात विष पसरत होते. मेलेला साप तो घेऊन आल्यानंतर आम्ही ते पाहिले आणि तातडीने योग्य विषविरोधी औषध त्याला दिले. हॉस्पिटलच्या उपचाराने त्याचा जीव वाचल्याचं डॉक्टर राजकुमार नायक यांनी सांगितले.
साप चावल्यानंतर काय करावे?
साप चावला की, काही जण घरगुती उपाय करतात. अंधश्रद्धेला बळी पडून साप चावलेल्या जागेवर मंत्रोच्चार करतात. ज्यात त्यांचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व उपाय करण्यात वेळ न घालवता साप चावल्यावर त्वरित रुग्णालय गाठावे. कोब्रा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. याची लांबी १८ फूटापर्यंत असू शकते. हा साप आपल्या शरीराचा एक तृतीयांश भाग उंच करू शकतो. या सापाचे शास्त्रीय नाव 'ओफीफॅगस हॅना' आहे. याच्या दंशाने ७ मिलीलीटर विष शरीरात जाते. हा साप चावल्यानंतर काही मिनिटातच मृत्यू होण्याची शक्यता असते.