ओडिशाच्या माजी महाधिवक्त्यास अटक
By admin | Published: September 23, 2014 06:18 AM2014-09-23T06:18:49+5:302014-09-23T06:18:49+5:30
सीबीआयने सोमवारी शारदा घोटाळाप्रकरणी कोलकाता येथे काँग्रेसचे खासदार अबू हासेम खान चौधरी आणि अनेक बँकांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली.
भुवनेश्वर/कोलकाता : ओडिशात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अर्थतत्त्व समूह या चिटफंड कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपावरून सोमवारी सीबीआयने राज्याचे माजी महाधिवक्ता अशोक मोहंती यांना अटक केली. दरम्यान, सीबीआयने सोमवारी शारदा घोटाळाप्रकरणी कोलकाता येथे काँग्रेसचे खासदार अबू हासेम खान चौधरी आणि अनेक बँकांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली.
मोहंती यांना त्यांच्या कटक येथील निवासस्थानाहून अटक करण्यात आली. अटकेनंतर छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने मोहंती यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले आणि तपासणीनंतर सीबीआयच्या मुख्यालयात आणण्यात आले. ‘अखेर सत्य समोर येईल. देव आणि गुरू साक्षीदार आहेत. मी कोणतेही वाईट कर्म केले नाही,’ असे मोहंती म्हणाले. याआधी १३ सप्टेंबरला सीबीआयने मोहंती यांची चौकशी केली होती आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मोहंती यांचा महाधिवक्तापदाचा राजीनामा मंजूर केला होता. ‘आपला अर्थतत्त्व समूहाशी कसलाही संबंध नाही. आपण या समूहाचे सीएमडी प्रदीप सेठी यांच्याकडून केवळ एक घर तेवढे विकत घेतले होते,’ असे मोहंती यांनी सांगितले. हे घर आपल्याला बक्षीस म्हणून मिळाल्याचा त्यांनी याआधीही इन्कार केला होता.
डॉ. मनमोहनसिंग यांना लिहिलेले पत्र मागे का घेतले, असा प्रश्न सीबीआय अधिकाऱ्यांनी चौधरी यांना विचारला. ‘शारदासह अन्य कंपन्या चिटफंडचा व्यवसाय नव्हे, तर रियल इस्टेटचा व्यवसाय करीत असल्याचे लक्षात आल्याने आपण पत्र मागे घेतले,’ असे उत्तर चौधरी यांनी दिले.
(वृत्तसंस्था)