ओडिशाच्या किनाऱ्याला तडाखा देणारा ‘नागाचा फणा’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 03:39 AM2019-05-04T03:39:19+5:302019-05-04T03:39:56+5:30
फनी चक्रीवादळ : आठ देश ठरवितात वादळांची नावे
मुंबई : ओडिशाच्या किनाऱ्यावर आदळलेल्या चक्रीवादळाला फोनी (फेनी, फॅनी वा फनी असाही त्याचा उच्चार केला जात आहे) नाव का देण्यात आले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इंग्रजीतील फनी (म्हणजे गंमतीदार) वरून हे नाव दिले की काय, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. पण फोनी हे नाव बांग्लादेशाने दिले असून, बंगालीत नागाच्या फण्याला फोनी म्हणतात. त्यामुळे नागाच्या फण्याने ओडिशाच्या किनाऱ्याला तडाखा दिला, असेच म्हणता येईल.
चक्रीवादळांना नाव देण्याची एक पद्धत आहे. एवढेच नव्हे, तर कोणत्या देशाने कोणत्या चक्रीवादळाला नाव द्यायचे, हेही ठरले आहे. पाश्चिमात्य देशांनी फार वर्षांपूर्वी अशा चक्रीवादळांना नावे देण्यास सुरुवात केली. ताशी ६५ किलोमीटरहून अधिक वेगाच्या चक्रीवादळालाच नाव दिले जाते. अमेरिकेने अनेकदा महिलांची नावेही अशा चक्रीवादळांना दिली आहे. काही वेळा प्रादेशिक वैशिष्ट्यानुसारही ही नावे ठरवली जातात. चक्रीवादळाला दिलेल्या नावामुळे कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्यात येते. महासागरानुसार जे झोन तयार केले आहेत, त्या-त्या झोनमधील देशांनी चक्रीवादळाचे नाव सुचवायचे असते.
अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळांना नाव देणे १९५३ साली सुरू झाले. हिंद महासागर क्षेत्रातील आठ देशांनी भारताच्या सूचनेनुसार २00४ पासून चक्रीवादळांचे नामकरण करण्याची सुरुवात केली. या आठ देशांत भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड व श्रीलंका यांचा समावेश आहे. प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी ८ नावे दिली असून, त्यांची एकूण संख्या आहे. ६४. भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावे सुचवली होती. लहर या नावाचे चक्रीवादळ २0१३ साली आले होते.
ओडिशा व आंध्र प्रदेशच्या किनाºयावर सर्वाधिक चक्रीवादळे धडकतात. गेल्या वर्षी ओडिशात आलेल्या चक्रीवादळाचे नाव तितली होते. त्याआधी २0१४ सालच्या चक्रीवादळाचे नाव होते हुडहुड, तर २0१३ साली आलेल्या चक्रीवादळाला फैलिन हे नाव देण्यात आले होते. त्याच वर्षीच्या एका चक्रीवादळाचे नाव होते हेलन. त्याआधी २0१0 साली आलेल्या चक्रीवादळाचे नाव गिरी होते. त्याआधी २00४ सालच्या चक्रीवादळांची नावे अग्नी व ओनिल अशी होती. याखेरीज नर्गिस, ऐला, माला अशी होती. आॅस्ट्रेलियातील एका चक्रीवादळाला मोनिका हे नाव देण्यात आले होते.
कसे होते चक्रीवादळ?
चक्रीवादळाचे शीतोष्ण आणि उष्ण असे दोन प्रकार असतात. जेव्हा शीत कटिबंधातून येणारी थंड हवा आणि उष्ण कटिबंधातून येणारी उष्ण हवा एकत्र होते, तेव्हा समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यालाच चक्रीवादळ असे म्हटले जाते. त्यांचा फटका प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या भागांना बसतो.
१९७७चे भयावह वादळ
आंध्र प्रदेशच्या किनाºयावर १९७७ साली भयावह चक्रीवादळ धडकले होते. त्यात किमान १0 हजार लोक मरण पावले होते. याखेरीज कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली होती. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्याच्या अवनीगड्डा, मछलीपट्टणम भागांत चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले होते.