भाजप नेत्याचे मॉडेलसोबत आक्षेपार्ह स्थितीतील फोटो व्हायरल, उडाली एकच खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 08:02 PM2021-06-08T20:02:30+5:302021-06-08T20:04:38+5:30
भाजपच्या युवा मोर्चाचे नेते विकास दुबे यांचा एका मॉडेलसोबतचा आक्षेपार्ह परिस्थितीतील फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
भाजपच्या युवा मोर्चाचे नेते विकास दुबे यांचा एका मॉडेलसोबतचा आक्षेपार्ह परिस्थितीतील फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे कानपूर येथे भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. विकास दुबे हे कानपूर-बुंदेलखंड विभागाचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. व्हायरल झालेले फोटो दोन वर्षांपूर्वीचे असल्याचं सांगितलं आहे. विकास दुबे काठमांडू येथे पर्यटनासाठी गेलेले असताना त्यांनी एका मॉडेलसोबत आक्षेपार्ह स्थितीत फोटो काढल्याचं सांगितलं जात आहे. फोटोतील मॉडेल कॉलगर्ल असल्याचंही म्हटलं जात आहे. एका बारमध्ये हा फोटो टिपण्यात आला आहे.
विकास दुबे यांच्यासोबत कानपूरमध्ये ड्युटी करत असलेला एक पोलीस अधिकारी आणि दुबे यांचे काही राजकीय मित्र परिवार नेपाळ येथे गेले होते. एका बारमध्ये असताना व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं. यात विकास दुबे एका मॉडेलसोबत अश्लिल पद्धतीनं वर्तन करत असल्याचं दिसून येत आहे. फोटो व्हायरल झाल्यानं कानपूरमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. याबाबत पक्षात वरीष्ठ नेत्यांकडे याबाबत तक्रार केली गेल्याचंही सांगण्यात आलं आहे. पण विकास दुबे यांच्याबाबत कुणीही साक्ष देण्यास तयार नसल्यानं त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही, असंही सांगण्यात येत आहे.
भाजप युवामोर्चाचे कानपूर-बुंदेलखंड विभाग अध्यक्ष विकास दुबे, नारायण सिंग भदौरिया आणि विभाग उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या मैत्रीची फार चर्चा होती. पण आता तिघांमध्ये फूट पडली आहे. नुकतंच नारायण सिंग यांच्या वाढदिवसाच्या पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली होती. संदीप ठाकूर यांच्या सांगण्यावरुनच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला गेला होता. त्यानंतर नारायण सिंग भदौरिया यांनी संदीप ठाकूर यांच्याबाबतची पोलखोल करण्यास सुरुवात केली. संदीप ठाकूर यांनी आपलं राजकीय वजन वापरुन त्यांच्यावर असलेले अनेक गुन्हे रफादफा करुन टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता विकास दुबे यांचे अश्लिल अवस्थेतील फोटो व्हायरल होत आहेत.
विकास दुबे यांच्याकडे १७ जिल्ह्यांचं नेतृत्व
कानपूर-बुंदेलखंड विभागाअंतर्गत एकूण १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. याचा भाजप प्रभारी म्हणून विकास दुबे कार्यरत आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप असतानाही २०१८ साली पुन्हा एकदा दुबे यांना विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. विकास दुबे यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. यात खुनाचा प्रयत्न, अवैध पद्धतीनं शस्त्रास्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.