काळे झेंडे दाखवायचे होते तर दुसरीकडे जाऊन मरायचं होतं, मोदी सरकारमधील मंत्र्याचे शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान
By बाळकृष्ण परब | Published: December 1, 2020 05:32 PM2020-12-01T17:32:10+5:302020-12-01T18:02:15+5:30
Farmer Protest News : शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनाही विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.
अंबाला - केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांवरून सध्या शेतकरी आणि केंद्र सरकार आमने-सामने आले आहेत. या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनाही विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री रतनलाल कटारिया यांनाही आज हरयाणामधील अंबाला येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना कटारिया यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. कटारिया यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यामुळे संतापलेल्या कटारिया यांनी शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केले.
आंदोलन करायचेच होते तर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन मरायचे होते, असे विधान कटारिया यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून केले. माझे आंबाला येथे सात ते आठ कार्यक्रम आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विरोधच करायचा होता तर कुठेतरी दुसऱ्या जागी जाऊन मरायचे होते. मला काळे झेंडे दाखवणाऱ्यांना देवाने सदबुद्धी द्यावी एवढीच प्रार्थना, असे कटारिया म्हणाले.
कटारिया अंबाला येथे आले असताना शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मोदी सरकार आणि कटारिया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करायला लावूनच आम्ही थांबणार आहोत, असे शेतकरी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांनाही विरोध केला आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाबाबत हरियाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनीही आक्षेपार्ह विधान केले होते. काही परकीय शक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आवडत नाही. या परकीय शक्ती शेतकऱ्यांना पुढे करून अडथळे आणत आहेत, धोरणे ही रस्त्यावर नाही तर संसदेत लोकप्रतिनिधी निश्चित कऱतात. शेतकऱ्यांनी विरोध करण्याऐवजी या कायद्यांचा परिणाम पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन-तीन महिने थांबावे, परिणाम न पाहता विरोध करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.