पंजाबमध्ये महिला अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 04:59 PM2019-03-30T16:59:37+5:302019-03-30T17:15:08+5:30
पंजाबमध्ये एका महिला अधिकाऱ्याची शुक्रवारी (29 मार्च) गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहा शौरी असं हत्या करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे.
चंदिगड - पंजाबमध्ये एका महिला अधिकाऱ्याची शुक्रवारी (29 मार्च) गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहा शौरी असं हत्या करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. दहा वर्षांपुर्वीचा बदला घेण्यासाठी एका केमिस्टने औषध परवाना अधिकारी महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हत्या करून हल्लेखोराने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील खरड येथील विभागीय औषध परवाना अधिकारी असलेल्या नेहा शौरी यांची शुक्रवारी कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली. बलविंदर सिंह असे आरोपीचं नाव असून त्याने बदला घेण्यासाठी नेहा यांची हत्या केली आहे. बलविंदर सिंह याचे औषधाचे दुकान होते. 2009 साली बलविंदरच्या औषधाच्या दुकानावर नेहा यांनी छापा टाकला होता. या छाप्यात नशेची काही औषधे आढळल्याने त्याचा परवाना रद्द करण्यात आला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
नेहा शौरी या अत्यंत प्रामाणिक अधिकारी होत्या. शुक्रवारी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी नेहा आपल्या भाचीसोबत बोलत असताना आरोपी बलविंदर त्यांच्या कार्यालयात घुसला. त्याने नेहा यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये नेहा शौरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबार करून बलविंदर पळून जात असताना काही नागरिकांनी त्याला घेरले. त्यावेळी त्याने घाबरून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याचे आदेश दिले आहेत.