अधिका-याने सांगितलं आणि निर्वासिताने वीजेच्या तारेला हात लावून जीव दिला
By admin | Published: March 7, 2016 11:37 AM2016-03-07T11:37:24+5:302016-03-07T11:37:24+5:30
तामिळनाडूमध्ये श्रीलंकन निर्वासिताने वीजेच्या तारेला हात लावून आपला जीव दिल्याची घटना घडली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
चेन्नई, दि. ७ - तामिळनाडूमध्ये श्रीलंकन निर्वासिताने वीजेच्या तारेला हात लावून आपला जीव दिल्याची घटना घडली आहे. अधिका-याने निर्वासिताला 'वीजेच्या खांबावर चढ आणि जीव दे' असं सांगितल होतं त्यानंतर काही क्षणातच हतबल झालेल्या रवींद्रन यांनी खरोखरच उच्च विद्युतदाब असलेल्या वीजेच्या तारेला हात लावून आपला जीव दिला. रवींद्रन वेतन मजूर होते. 26 वर्षापुर्वी ते निर्वासित म्हणून भारतात आले होते.
मिळालेल्या माहितीप्रमाणे रवींद्रन यांचा मुलगा आजारी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवींद्रन यांनी निर्वासीत छावणीमधील महसूल अधिका-याला आपल्या आजारी मुलाला अनुपस्थित न दाखवण्याची विनंती केली होती. कारण जर त्याला अनुपस्थित दाखवलं असत तर त्यांना त्या दिवसाचं जेवण मिळालं नसत. मात्र अधिका-याने कोणतीही दया न दाखवता त्यांच्या मुलाला अनुपस्थित दाखवलं. आणि मुलगा रुग्णालयात असल्याचा पुरावा म्हणून वैद्यकीय पावतीही जोडली. साक्षीदारांनी सांगितल्याप्रमाणे अधिकारी तपासणीसाठी आला असता झालेल्या वादात अधिका-याने रवींद्रन यांना 'वीजेच्या खांबावर चढ आणि जीव दे' असं सांगितलं
अधिका-यासोबत झालेल्या बाचाबाचीनंतर हतबल झालेल्या रवींद्रन यांनी उच्च विद्युतदाब असलेल्या वीजेच्या तारेला हात लावून आपला जीव दिला. रवींद्रन यांच्या मृत्यूनंतर संतापलेल्या लोकांनी अधिका-याला घेराव घातला. पोलिसांनी मध्यस्थी करत अधिका-याची सुटका केली. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी लोकांनी अधिका-याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्यानंतरच मृत्यूच नेमकं कारण कळेल अशी माहिती पोलीस अधिकारी विजयेंद्रन यांनी दिली आहे.