पदाधिकारी गायब, सदस्य हैराण

By admin | Published: December 14, 2015 07:31 PM2015-12-14T19:31:13+5:302015-12-14T19:34:02+5:30

विकासकामे खोळंबल्याचा आरोप : सीईओ अडकले फाईलीत

Officers missing, member Haren | पदाधिकारी गायब, सदस्य हैराण

पदाधिकारी गायब, सदस्य हैराण

Next

विकासकामे खोळंबल्याचा आरोप : सीईओ अडकले फाईलीत
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून पदाधिकारी जिल्हा परिषदेकडे फिरेनासे झाल्याने जिल्हा परिषद सदस्य हैराण झाले असून, पदाधिकारी भेटत नसल्याने विकासकामे खोळंबल्याचा आरोप सदस्यांमधून करण्यात येत आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीही नवीनच असल्याने ते नस्तींचा (फाईलींचा)अभ्यास करण्यात गुंतल्याचाही आरोप सदस्यांमधून करण्यात येत आहे.
सोमवार व मंगळवार मुख्यालयात पदाधिकारी व अधिकारी यांनी थांबावे, अभ्यागतांना वेळ देऊन त्यांची कामे करावीत, असा अलिखित नियमच आहे. काल (दि.१४) जिल्हा परिषदेत एकही पदाधिकारी नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या सदस्यांचा वेळ व पैसा वाया गेल्याचा आरोप काही सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. गेल्या काही महिन्यांपासून विकासकामे होत नसून केवळ फाईलींचा प्रवास लांबत असल्याचा आरोपही आता करण्यात येत आहे. दलितवस्ती सुधार योजनेच्या ३५ कोटींचेही अद्याप नियोजन झालेले नाही. तसेच ग्रामपंचायतींकडून दहा टक्के लोकवर्गणीही घेऊनही तीन कोटींच्या सौर पथदीपांची खरेदी होऊ शकलेली नाही. जिल्हा परिषद सेस व जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या निधीचेही अद्याप नियोजन झालेले नसल्याचे बोलले जाते. अधिकारीही सोमवार आणि मंगळवार मुख्यालयात थांबत नसल्याने सदस्यांची कामे रखडत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. प्रशासनावर नियंत्रण तरी कोणाचे आणि सदस्यांच्या मतदारसंघातील विकासकामे कधी मार्गी लागणार, अशी चर्चा आता जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सुरू झाली आहे. नवीन बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही प्रत्येक फाईलीचा अभ्यास करूनच नंतर निर्णय घेण्याची पद्धत अवलंबली असली तरी त्यामुळे किरकोळ कामांनाही आठवडा उलटत असल्याचा आरोेप सदस्यांकडून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)

नियमित आढावा
आपण दर मंगळवारी खातेप्रमुखांचा नियमित आढावा घेऊन जिल्हा परिषदेच्या योजना व कामांबाबत आढावा घेतो. सेसच्या निधीचे नियोजन होऊन कामांची देयकेही सादर होत आहे. दलितवस्ती सुधार योजनेत नियमानुसार फेर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आलेले आहेत. आपण दररोज जिल्हा परिषदेत नियमित हजर असते. कोणती विकासकामे खोळंबली त्याची यादी दिली तर प्रस्ताव मार्गी लावू.
- विजयश्री चुंबळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: Officers missing, member Haren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.