अप्पर सचिव आणि सिनिअर रँक अधिकाऱ्यांना आता रोज कार्यालयात हजर रहावं लागणार, केंद्रानं जारी केले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 07:00 PM2021-06-14T19:00:46+5:302021-06-14T19:01:24+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना देशातील बहुतेक राज्यांनीही अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यातच आता केंद्र सरकारनंही सरकारी कामकाज पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीची तयारी सुरू केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना देशातील बहुतेक राज्यांनीही अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यातच आता केंद्र सरकारनंही सरकारी कामकाज पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर अप्पर सचिव आणि त्यापेक्षा वरीष्ठ अधिकाऱ्यांना आता दैनंदिन पातळीवर कार्यालयात हजर राहण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना आता कार्यालयातून काम करावं लागणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्यासाठी ऐश्चिक स्वरुपाचा पर्याय दिला होता. यात अधिकाऱ्यांना दैनंदिनरित्या कार्यालयात हजर राहण्याचं बंधन नव्हतं. केवळ ५० टक्के उपस्थितीसह सरकारी कार्यालयं सुरू होती. केंद्राचे हे आदेश १५ जूनपर्यंत कायम ठेवण्यात आले होते. पण आता कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्यामुळे अप्पर सचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांना दैनंदिन पातळीवर कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.
दरम्यान, कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं लागणार आहे. यात मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, सॅनिटायझरचा सुयोग्य वापर करणं, असे नियम घालून देण्यात आले आहेत.
देशात गेल्या २४ तासांत ७० हजार ४२१ नवे रुग्ण
देशाची राजधानी दिल्लीसह बहुतेक राज्यांमध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. देशातील दैनंदिन रुग्णवाढ आता १ लाखाच्या खाली आली आहे. देशात गेल्या २४ तासांत ७० हजार ४२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता २,९५,१०,४१० वर पोहोचली आहे. तसेच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील आता १० लाखांच्या खाली आली आहे.