‘डोक्यात हवा गेलेल्या अधिकाऱ्यांनी यांच्याकडून शिकावं’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 11:04 AM2022-05-28T11:04:10+5:302022-05-28T11:05:09+5:30
सोशल मीडियावर एकाच फोटोमध्ये या तिन्ही अधिकाऱ्यांचे फोटो एडिट करून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत
नवी दिल्ली : समाजात चांगली आणि वाईट दोन्ही माणसे असतात. एकीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांना पाळीव कुत्र्याला फिरवता यावे यासाठी खेळाडूंना मैदान रिकामे करण्यास सांगितल्याची चर्चा आहे. त्याचवेळी, बिहारमधील कटिहार जिल्ह्याचे डीएम उदयन मिश्रा शाळेतील मुलांसोबत माध्यान्ह भोजन केल्यामुळे चर्चेत आहेत. तसेच, आसामच्या कचार जिल्ह्याच्या उपायुक्त कीर्ती जल्ली या महिला अधिकारी यांचे फोटोदेखील इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत, ज्यात त्या स्थानिक लोकांसोबत आसामच्या पुराचा आढावा घेताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर एकाच फोटोमध्ये या तिन्ही अधिकाऱ्यांचे फोटो एडिट करून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या फोटोसोबत विविध कॅप्शन्सदेखील वापरल्या जात आहेत. संजीव खिरवार, उदयन मिश्रा आणि कीर्ती जल्ली या तिघांनीही कठोर परिश्रम करूनच यूपीएससी उत्तीर्ण केली असेल, पण लोकसेवेत रुजू झाल्यानंतर त्यांच्या विचारसरणीत इतका मोठा फरक पडला, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
कटिहारचे जिल्हा दंडाधिकारी उदयन मिश्रा यांनी अचानक सरकारी शाळेला भेट दिली. तेथील मुलांना दिले जाणारे माध्यान्ह भोजन त्यांच्यासोबतच जमिनीवर बसून खाल्ले. डोक्यात हवा गेलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी यांच्याकडून बोध घ्यावा, असे नेटकरी म्हणत आहेत.