माकडेही पळवतात सरकारी फाईल्स
By admin | Published: July 15, 2014 01:58 AM2014-07-15T01:58:10+5:302014-07-15T01:58:10+5:30
एखादी महत्त्वाची सरकारी फाईल गायब होणे किंवा हरवणे या घटना मंत्रालय वा संसदेसारख्या कार्यालयांमध्ये नव्या नाहीत
नवी दिल्ली : एखादी महत्त्वाची सरकारी फाईल गायब होणे किंवा हरवणे या घटना मंत्रालय वा संसदेसारख्या कार्यालयांमध्ये नव्या नाहीत. मात्र संसद भवनातील अनेक फाईल्स गायब होण्यामागे कुठला घोटाळा नसून, या परिसरात उच्छाद मांडणारी माकडे आहेत हे वाचून कुणालाही आश्चर्य वाटेल.
नॉर्थ ब्लॉकमध्ये या माकडांनी हैदोस घातला असून ते अनेकदा येथील फाईल्स पळवून नेत असल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र याबाबत सरकारने कुठलीच कारवाई अद्याप केलेली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हाही नॉर्थ ब्लॉकमध्ये या माकडांचा गोंधळ राहत असे. येथील व्हरांड्यात पडलेल्या फाईल्स ही माकडे पळवून नेत व त्याचा खेळ करत. या माकडांना पळवून लावण्यासाठी वानराला पाचारण केले जाई मात्र ते फार खर्चीक प्रकरण ठरत असे.
फाईल्स पळवण्याचा हा मुद्दा जेव्हा राज्यसभेत काँग्रेस सदस्य राजीव शुक्ला यांनी मांडला तेव्हा उपस्थितांना हसू आवरले नाही. या माकडांवर काही कारवाई करणे हे अवघड काम असल्याचे सांगून, एक मंत्रीच या माकडांविरुद्धच्या कारवाईच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)