एअर इंडियाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 08:52 AM2018-03-15T08:52:48+5:302018-03-15T08:52:48+5:30
अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सकडून त्यावरून तुर्कीश एअरलाईन्सचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते.
नवी दिल्ली: भारतीय हवाई कंपनी एअर इंडियाचे ट्विटर अकाऊंट गुरुवारी हॅक झाल्याचा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार या सगळ्यामागे काही तुर्कीश हॅकर्सचा हात असल्याचे समजते.
एअर इंडिया ही भारतातील प्रमुख हवाई सेवांपैकी एक असल्याने अनेकजण या अकाऊंटला फॉलो करतात. मात्र, गुरुवारी हे ट्विटर हँडल अचानक हॅक झाले. अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सकडून त्यावरून तुर्कीश एअरलाईन्सचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. या ट्विटमधील मजकूरही तुर्कीश भाषेत होता.
काल मध्यरात्री हा प्रकार घडला. एअर इंडियाच्या विमानांची सगळी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, आम्ही आता तुर्किश एअरवेजसोबत आहोत असे सांगणारे संदेश ट्विट म्हणून पडू लागले तेव्हा हे अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात आले. याशिवाय, हॅकर्सकडून @airindiain हे युजरनेम बदलून @airindiaTR करण्यात आले.
एअर इंडियाकडून याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काही वेळापूर्वीच हॅकर्सनी केलेली ट्विटस् डिलीट करण्यात आली आहेत. मात्र, अजूनही एअर इंडियाच्या ट्विटर हँडलवर गेल्यास पेंडिंग मेसेजस दाखवण्यात येत आहेत. परंतु, त्यावर क्लिक केल्यास हे मेसेज ओपन होत नाहीत. त्यामुळे एअर इंडियाकडून अजूनही ट्विटर हँडल पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. यापूर्वी डिसेंबर महिन्यात भाजपाचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले होते.
Official Twitter account of #AirIndia hacked
— ANI Digital (@ani_digital) March 14, 2018
Read @ANI story | https://t.co/YFvjJiJn9Spic.twitter.com/b6HNOa49En