भाजपा आमदाराची अधिकृत वेबसाईट हॅक; पाकिस्तानचा झेंडा फडकवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 13:55 IST2023-10-20T13:47:13+5:302023-10-20T13:55:28+5:30
वादग्रस्त मजकूरही येथे लिहिण्यात आला होता. त्यामुळे, आमदार महोदयांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली.

भाजपा आमदाराची अधिकृत वेबसाईट हॅक; पाकिस्तानचा झेंडा फडकवला
लखनौ - उत्तर प्रदेशातील भाजपाआमदार एका हॅकर्सच्या कृत्याचे शिकार ठरले आहेत. लखनौमधील ह्या भाजपाआमदाराची अधिकृत वेबसाईट हॅकर्सकडून हॅक करण्यात आली होती. त्यानंतर, या वेबसाईटवर पाकिस्तानचा झेंडा लावण्यात आला, पाकिस्तान झिंदाबादचे नारेही वेबसाईटवर लिहिण्यात आले होते. विशेष म्हणजे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो लावून वादग्रस्त मजकूरही येथे लिहिण्यात आला होता. त्यामुळे, आमदार महोदयांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली.
लखनौ उत्तर विधानसभा मतदारसंघातून डॉ. नीरज बोरा हे आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वीच हॅकर्सकडून त्यांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आली. त्यावर, पाकिस्तानचा झेंडा फडकावत आपत्तीजनक मजकूरही प्रसिद्ध करण्यात आला होता. नीरज बोरा यांनी सरकारी व लोककल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांना सहज उपलब्ध व्हावी. तसेच, आपणासंबंधी माहितीही जनतेपर्यंत पोहोचवण्यात सहजता यावी, या उद्देशाने डॉ. बोरा यांनी ही वेबसाईट सुरू केली होती. Drneerajbora.in या नावाने ही वेबसाइट बनवण्यात आली होती. या वेबसाइटला हॅकर्सने लक्ष्य बनवून हॅक केले. त्यानंतर, वादग्रस्त मजकूरही त्यावरुन प्रसिद्ध केला. त्यामुळे, आमदार बोरा यांनी पोलीस स्टेशन गाठत यासंदर्भात माहिती व तक्रार दिली. त्यानंतर, पोलिसांनी सायबर विभागाकडे याची माहिती दिली असून सायबर विभाग पुढील तपास करत आहे. सध्या वेबसाईटवर अंडर मेन्टनेन्स अशा आशयाचा मजकूर दिसून येत आहे.
दरम्यान, ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे.