अरे बापरे ! १० मिनिटांसाठी कोलकातामधील ८५ विमानांचा संपर्क तुटला
By admin | Published: April 8, 2016 02:21 PM2016-04-08T14:21:31+5:302016-04-08T14:21:31+5:30
तब्बल १० मिनिटांसाठी ८५ विमानांचा संपर्क कोलकाता एअर ट्राफिक कंट्रोलशी तुटला होता,सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी अहवाल मागवला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत -
कोलकाता, दि. ८ - तब्बल १० मिनिटांसाठी ८५ विमानांचा संपर्क कोलकाता एअर ट्राफिक कंट्रोलशी तुटला होता. त्यामुळे हजारो लोकांचा जीव धोक्यात आला होता. सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी अहवाल मागवला आहे. गुरुवारी हा प्रकार घडला. सकाळी ७.३०च्या दरम्यान विमानांचं ठिकाण दाखवणारा डिस्प्ले बंद पडल्याने विमानांशी संपर्क पुर्णपणे तुटला होता. यावेळी कोलकातामध्ये ८५ विमाने उडत होती.
विमानांच्या वाहतुकीची माहिती देणारी यंत्रणा बंद पडल्याने प्रोटोकॉलप्रमाणे हाय फ्रिक्वेन्सीद्वारे विमानांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती यंत्रणादेखील बंद पडल्याचं लक्षात आलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकाता विमानतळावरील बीएसएनएल नेटवर्क फेल झाल्याने ही समस्या निर्माण झाली. इंटरनेट प्रोटोकॉलच्या माध्यमातून वापरण्यात येणा-या या लाईनद्वारे वैमानिकांशी संपर्क साधून त्यांना इतर विमानांची माहिती दिली जाते. तसंच विमानांमधील सुरक्षित अंतर किती आहे याबद्द्ल संदेश दिला जातो.
अशाप्रकारे संपर्क तुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोलकाता विमानतळावर देशातील अर्ध्याहून जास्त विमानांवर नियंत्रण ठेवलं जात. त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्यावर सगळ्यांचीच गडबड झाली होती. एअर ट्राफिक कंट्रोलच्या अधिका-यांनी वाराणसी, पाटणा, गया येथे संदेश पाठवून विमानांशी संपर्क साधून त्यांना मार्गदर्शन करण्याची सूचना केली होती. १० मिनिटांनी नेटवर्क पुन्हा सुरळीत झाल्याचं अधिका-यांनी सांगितलं आहे.