अरे बापरे ! आईसाठी तरुणाने खोदली 55 फूट विहीर
By Admin | Published: April 27, 2016 02:12 PM2016-04-27T14:12:05+5:302016-04-27T14:12:05+5:30
आपल्या आईला पाणी भरण्यासाठी वारंवार फे-या माराव्या लागू नयेत यासाठी पवन कुमार या 17 वर्षीय तरुणाने घरामागे 55 फूट विहीर खोदली आहे
>ऑनलाइन लोकमत -
बंगळुरु, दि. 27 - इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर माणूस काय करु शकतो याचं उदाहरण कर्नाटकमधील पवन कुमार या तरुणाने दिलं आहे. आपल्या आईला पाणी भरण्यासाठी वारंवार फे-या माराव्या लागू नयेत यासाठी पवन कुमार या 17 वर्षीय तरुणाने घरामागे 55 फूट विहीर खोदली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही विहीर त्याने एकट्याने खोदली आहे. मदतीला कोणी कामगार नसतानाही पवन कुमारने एकट्याच्या जिद्दीवर ही विहीर खोदली. यासाठी त्याला 45 दिवस लागले.
पवन कुमारची आई नेत्रावती छापखान्यात काम करते. कामावरुन घरी आल्यावर तिला पाणी भरण्यासाठी सार्वजनिक विहिरीवर जावं लागायचं. यासाठी तिला अनेक फे-या माराव्या लागायच्या. पवन कुमारला आपल्या आईचा हा त्रास पाहावला नाही आणि त्याने विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. 'या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याचा मी निर्णय घेतला आणि घरामागे विहीर खोदण्यास सुरुवात केली', असं पवन सांगतो.
पवनचे वडील आचारी म्हणून काम करतात. मालनाड जिल्ह्यात प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाक़डे विहीर आहे. पण पवन कुमार यांच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने विहीर खोदणे त्यांना शक्य नव्हते. पवनने विहिर खोदण्यासाठी गावातील तज्ञ कन्नप्पा यांच्याशी संपर्क साधला. कन्नप्पा यांनी पाणी लागेल अशी जागा दाखवल्यावर 26 फेब्रुवारीला पवनने विहीर खोदण्यास सुरुवात केली. गरिब असल्याने या कामासाठी कामगार आणणे त्यांना शक्य नव्हते त्यामुळे पवनने एकट्याने हे खोदकाम सुरु केले.
पवन सध्या शिक्षण घेत आहे, त्यामुळे मधल्या काळात 10 दिवसांसाठी परिक्षेसाठी त्याने खोदकाम थांबवलं होतं. परिक्षा संपल्यावर त्याने पुन्हा खोदकाम करण्यास सुरुवात केली. तब्ब्ल 45 दिवस खोदकाम केल्यानंतर 20 एप्रिलला विहिर खोदून पुर्ण झाली होती. 'तळपत्या उन्हात या जमिनीत खोदकाम करणं खुपच कठीण होतं. 53 फूट खोदकाम केल्यानंतर जेव्हा पाणी लागलं तेव्हा मला तृप्त झाल्यासारखं वाटलं. अजून 2 फूट खोदून मी काम पुर्ण केलं. आता माझ्या आईला कामावरुन आल्यावर पाणी भरण्यासाठी सार्वजनिक विहिरीवर जाण्याची गरज भासणार नाही याचा आनंद', झाल्याची भावना पवन कुमारने व्यक्त केली आहे.