अहो आश्चर्यम ! आता जीमेलवरून पाठवता येणार पैसे
By admin | Published: March 16, 2017 10:47 PM2017-03-16T22:47:53+5:302017-03-16T22:47:53+5:30
अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना आता जीमेल अॅपच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना आता जीमेल अॅपच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहेत. ग्राहकांच्या आग्रहास्तव गुगलनं हे नवीन फीचर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. विशेष म्हणजे ही सेवा गुगलमार्फत मोफत देण्यात येणार आहे. सध्या तरी हे फीचर अमेरिकेतल्या वापरकर्त्यांसाठी वापरात आणलं आहे. मात्र लवकरच ते सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
'फी-फ्री' नावाच्या या फीचरमध्ये जीमेल अॅपमधून फोटो किंवा फाईल तुम्हाला सहजगत्या पाठवता येणार असून, त्याच पद्धतीने आता पैसे पाठवणं सहजशक्य होणार आहे. हे पैसे वापरकर्त्यांना स्वतःच्या बँक खात्यातही जमा करता येणार आहेत. या अॅपच्या माध्यमातून पैसे पाठवणे हे ई-मेलमधून एखादी फाईल पाठवण्याइतकं सोपं झालं आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी गुगलनं ऑनलाइन ग्राहकांच्या व्यवहारासाठी अशाच प्रकारचं गुगल वॉलेट हे फीचर लाँच केलं होतं. त्याला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. अँड्रॉइड मोबाईल युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध नसल्यानं त्याला लोकांनी जास्त पसंती दिली नव्हती. जगभरात जीमेलचं जाळं मोठ्या विस्तारत असून, जीमेलचे आजमितीस जवळपास 1 अब्ज वापरकर्ते आहेत. त्यातील 75 टक्के लोक हे मोबाईलच्या माध्यमातून जीमेलचा वापर करतात. तसेच जगभरातल्या स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी 80 टक्के युझर्स हे अँड्रॉइड फोन वापरतात. त्यामुळेच हे फीचर जास्तीत जास्त लोकांच्या पसंती उतरणार असल्याचा गुगलला विश्वास आहे.