तेलकंपन्यांची भारतामध्ये वर्षभरात 8 लाख 94 हजार 40 कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 03:10 PM2017-11-29T15:10:08+5:302017-11-29T15:14:32+5:30
इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी या तीन तेलकंपन्यांनी 2016-17 या वर्षभरामध्ये 8,94,040 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कर वजा करुन या कंपन्यांनी एकत्रित 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.
मुंबई- इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी या तीन तेलकंपन्यांनी 2016-17 या वर्षभरामध्ये 8,94,040 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कर वजा करुन या कंपन्यांनी एकत्रित 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. पुणेस्थित माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी मागवलेल्या माहितीमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.
या तिन्ही कंपन्यांमध्ये 2016-17 या वर्षभरात इंडियन ऑइल कंपनीची उलाढाल सर्वात जास्त आहे. या कंपनीने 4 लाख 38 हजार 692 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. त्यापाठोपाठ भारत पेट्रोलियम कंपनीने 2,41,859 कोटींचा व्यवसाय केला असून भारत पेट्रोलियमने 2,13,489 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या तिन्ही कंपन्यांची 2015-16 या वर्षी 7लाख 11 हजार सातशे कोटींची उलाढाल होती. त्याआधीच्या वर्षी 8 लाख 80 हजार 675 कोटी रुपयांची उलाढाल या तिन्ही कंपन्यांनी केली होती. 2019-17 या वर्षभरात इंडियन ऑइल कंपनीने कर वजा करुन 19,106 कोटी रुपये नफा मिळवला आहे तर हिंदुस्थान पेट्रोलियमने 6,209 कोटी आणि भारत पेट्रोलियमने 8,039 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. म्हणजेच कर वगळून या तिन्ही कंपन्यांनी या वर्षभरात 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्या वर्षी कर वगळून या तिन्ही कंपन्यांचा नफा 21,694 कोटी तर 2014-15 या वर्षात या कंपन्यांनी कर वगळून 13,091 कोटी रुपयांचा नफा मिळवल्याचे दिसून येते. याचाच अर्थ या कंपन्यांचा नफ्याचा आलेख वेगाने वाढत आहे. 19 ऑक्टोबर 2014 पासून पेट्रोलियम उत्पादनाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या पदार्थांच्या किंमतीवर ठरवल्या जात आहे. या किंमती ठरवण्याचे निर्णय ऑइल मार्केटिंग कंपन्यांद्वारे घेतले जातात.
कर वजा जाता या तिन्ही कंपन्यांनी या 2014 ते 2017 या तीन वर्षांमध्ये 65 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवलेला आहे. या कंपन्यांनी आपल्या नफ्याचा वापर सामान्य ग्राहकांना देण्यासाठी करावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधनांचे दर कमी करण्यासाठी या कंपन्यांवर दबाव आणला पाहिजे असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी व्यक्त केले आहे.