तेल बाजार गडगडला; येत्या काही आठवड्यात खनिज तेलाचे उत्पादन बंद करावे लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:56 AM2020-03-31T01:56:10+5:302020-03-31T06:34:53+5:30

कच्च्या तेलाला मागणी नसल्यामुळे उत्पादक तेलाचे साठे करून ठेवण्याचा पर्याय सध्या वापरीत आहेत.

The oil market tumbles; Mineral oil production is likely to cease in the coming weeks | तेल बाजार गडगडला; येत्या काही आठवड्यात खनिज तेलाचे उत्पादन बंद करावे लागण्याची शक्यता

तेल बाजार गडगडला; येत्या काही आठवड्यात खनिज तेलाचे उत्पादन बंद करावे लागण्याची शक्यता

Next

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगातील उद्योग व वाहने थांबल्यामुळे कच्च्या तेलाची बाजारपेठ गडगडली आहे. कोरोना विषाणूचे थैमान थांबण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे येत्या काही आठवड्यांत कच्च्या तेलाचे उत्पादनच बंद करावे लागेल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. केवळ तेल उत्पादनावर अवलंबून असलेल्या नायजेरियासारख्या देशाची अर्थव्यवस्था या संकटामुळे पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

कच्च्या तेलाला मागणी नसल्यामुळे उत्पादक तेलाचे साठे करून ठेवण्याचा पर्याय सध्या वापरीत आहेत. तेल क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘ब्लॅक गोल्ड इन्व्हेस्टर्स एलएलसी’चे गुंतवणूक अधिकारी गॅरी रॉस यांनी सांगितले की, फिजिकल तेल बाजार गोठला आहे. या आठवड्यात जगभरातील पेट्रोलची मागणी ५० टक्क्यांनी घटणार आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी विकोपाला जाईल. आयएचएस मार्किटचे विश्लेषक टॉम क्लोझा यांनी सांगितले की, अमेरिकेतील पेट्रोलची मागणी निक्सन राष्ट्राध्यक्ष असतानाच्या १९७० च्या प्रारंभीच्या काळाच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे.

जगात दररोज साधारणत: १०० दशलक्ष बॅरल तेल वापरले जाते. काही आठवड्यांत यातील एक चतुर्थांश वापर गायब झाला आहे. सूत्रांनी सांगितले की, जगातील रोजच्या एकूण तेल उत्पादनाच्या तुलनेत मागणी २० दशलक्ष बॅरलनी कमी आहे. विक्रीअभावी पडून असलेले तेल साठविण्याचे प्रयत्न उत्पादक सध्या करीत आहेत.

सध्या करण्यात आलेले तेल साठे इतके जास्त आहेत की, आगामी दोन ते तीन महिन्यांची जगाची मागणी त्यातून पुरविली जाऊ शकेल. पडून राहिलेल्या साठवणूक सुविधा उत्पादक वापरीत आहेत.समुद्रकिनाऱ्यावरील उत्पादक समुद्रात सुपर टँकर्स भाड्याने घेऊन तेल साठे करीत आहेत. टँकर पुरवठादार कंपन्यांची यात चांदी झाली आहे. पुरवठा करणे शक्य नसल्यामुळे ‘प्लेन्स आॅल अमेरिकन पाइपलाइन एलपी’ यासारख्या आघाडीच्या अमेरिकी पाइपलाइन कंपन्यांनी तेल उत्पादक कंपन्यांना उत्पादन थांबविण्यास सांगितले आहे.

ट्रफिगुरा ग्रुपचे सहप्रमुख बेन लकलॉक यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये तेल वापरात २२ दशलक्ष बॅरलची घट होईल, असा अंदाज आहे. सूत्रांनी सांगितले की, तेल उद्योगाची बांधणीच ‘पुरवठ्याची सुरक्षा’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, हा मुद्दाच कधी विचारात घेतला गेला नाही.

जगभरात ७०० रिफायनरीज कच्च्या तेलातून पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधन बनवितात. मागणी घटल्यामुळे रिफायनरिज बंद पडत चालल्या आहेत. इटलीतील एक रिफायनरी शुक्रवारी बंद करण्यात आली. शुद्धिकरण करण्यास कठीण असलेले चिकट आणि सल्फरसंयुक्त कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड घसरल्या आहेत. अमेरिकेतील ओक्लाहामा सोअरचे दर ५.७५ डॉलर, नेब्रास्का इंटरमीजिएटचे दर ८ डॉलर आणि व्योमिंग स्वीटचे दर ३ डॉलर झाले.

आशियाई बाजार १७ वर्षांच्या नीचांकावर

सिंगापूर : रिफायनरींकडून पेट्रोल-डिझेल उत्पादनासाठी वापरल्या जाणाºया नेहमीच्या कच्च्या तेलाच्या किमती १७ वर्षांच्या नीचांकावर गेल्या आहेत. अमेरिकी बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीजिएटचे दर ५.३ टक्क्यांनी घसरून प्रतिबॅरल २० डॉलर झाले. ब्रेंट खनिज तेलाचे दर ६.५ टक्क्यांनी घसरून २३ डॉलर झाले.

अनेक ठिकाणी कपात

पुढच्या टप्प्यात उत्पादन बंद करण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. ब्राझिल सरकारची कंपनी पेट्रोब्रासने तेल उत्पादनात दररोज एक लाख बॅरलची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कॅनडात काही कंपन्यांनी उत्पादन थांबविले आहे. चाडमधील ग्लेकोअर पीएलसीनेही उत्पादन बंद केले आहे.

Web Title: The oil market tumbles; Mineral oil production is likely to cease in the coming weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.