तेलबिया, कडधान्यावर आयात शुल्क वाढविणार, आठवडाभरात अधिसूचना निघणार, हमीभाव मिळण्यासाठी मंत्रिगटामध्ये चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:11 AM2017-11-02T03:11:38+5:302017-11-02T03:12:14+5:30
- विकास झाडे
नवी दिल्ली : आयात शुल्क वाढवायचे, निर्यातीला परवानगी द्यायची आणि काही गोष्टींवर निर्बंध आणले तरच तेलबिया आणि कडधान्यास किमान हमीभाव मिळेल यावर आज मंत्रीगटाने निर्णय घेतला असून येत्या आठवडाभरात याला मूर्त रूप येणार आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत श्रमशक्ती भवनात पार पडलेल्या मंत्रीगटाच्या बैठकीत कडधान्य आणि तेलबियांवर विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत कृषीमंत्री राधामोहन सिंग, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, कॅबिनेट सचिव पी.के. सिन्हा, संबंधीत खात्याचे सर्व सचिव उपस्थित होते.
देशभरात तेलबिया आणि कडधान्यास हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. यामुळे काही ठिकाणी शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्याची चर्चा या बैठकीत झाली. सोयाबिन, भुईमुग, उडीद, तूरडाळीला हमी भावापेक्षा अधिक किंमत कशी मिळवून देता येईल यावरही सदस्यांनी आपले मत मांडले. पाम तेलावरील आयात शुल्क हे २५ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांवर वाढविण्यात यावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
येत्या आठवड्यातच यावर अधिसूचना काढली जाईल अशी माहिती सुत्राने दिली.
महाराष्ट्रात हमीभावाची समस्या अधिक
पाशा पटेल म्हणाले, खुल्या बाजारपेठेत हमी भावापेक्षा अधिक दर शेतकºयांना मिळू शकेल, सरकारला त्यासाठी शेतकºयांच्या व्यथांकडे बारकाईने लक्ष घालावे लागेल. आपण त्यासाठीच दिल्लीत दाखल झाला आहोत.
तेलबिया व डाळ उत्पादन करणाºया महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ व राजस्थानात हमी भावाबाबत समस्या निर्माण झाली आहे. या बैठकीत खासदार संजयकाका पाटील सहभागी झाले होते.