ओके हा निरर्थक शब्द, कर्मचारी भरतीतील प्रश्नाचा वाद कोर्टात; अपशब्द ‘अर्थपूर्ण इंग्रजी’ नाही : दिल्ली उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 01:32 PM2024-10-19T13:32:47+5:302024-10-19T13:33:43+5:30
कर्मचारी निवड आयोगाने भारत सरकारमधील विविध नागरी पदांवर भरतीसाठी एकत्रित परीक्षा घेतली होती. या परीक्षेत इंग्रजी ओ, ई, के आणि वाय या अक्षरांतून किती अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतात, असा एक प्रश्न ३ मार्कांसाठी हाेता. उत्तरासाठी १, २, ३ आणि ४ असे पर्याय होते...
डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली : ओके हा अर्थ नसलेला शब्द आहे. अनौपचारिक वापरातील शब्द किंवा अपशब्दांना अर्थपूर्ण भाषा म्हणता येणार नाही, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे.
कर्मचारी निवड आयोगाने भारत सरकारमधील विविध नागरी पदांवर भरतीसाठी एकत्रित परीक्षा घेतली होती. या परीक्षेत इंग्रजी ओ, ई, के आणि वाय या अक्षरांतून किती अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतात, असा एक प्रश्न ३ मार्कांसाठी हाेता. उत्तरासाठी १, २, ३ आणि ४ असे पर्याय होते. शुभम पाल या उमेदवाराने ‘एक’ म्हणून उत्तर चिन्हांकित केले. निवड आयोगाने जाहीर केलेल्या उत्तरामध्ये याचे उत्तर ‘दोन’ होते. शुभम आणि इतर काही उमेदवारांनी परीक्षेतील आयोगाच्या अशा एकूण ७ उत्तरांच्या अचूकतेला हायकोर्टात आव्हान दिले. दिल्ली हायकोर्टाने आयोगाची ६ उत्तरे मान्य केली. परंतु, ‘ओ ई के वाय’ या प्रश्नाबद्दल याचिकाकर्त्याचे उत्तर बरोबर ठरवले.
आयोगाने ‘ओके’बद्दल २ हेच उत्तर बरोबर असल्याचा दावा करीत भाषातज्ज्ञांच्या मतामध्ये उच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, अशी भूमिका घेत या निर्णयास आव्हान दिले. तर, खंडपीठाने चुकीचे उत्तर न देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण न देणे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले. ओके हा केवळ अनौपचारिक वापरातील शब्द असून, याला कोणताही अर्थ नसल्याचे निरीक्षण न्या. सी. हरीशंकर आणि न्या. सुधीरकुमार जैन यांनी नोंदवले.
ओके ते ओके...
कर्मचारी निवड आयोगाचे म्हणणे होते O E K Y पासून ‘YOKE’ आणि ‘OKEY’ हे २ शब्द बनतात.
उमेदवारांनी युक्तिवाद केला की, या अक्षरांपासून ‘YOKE’ हा एकच ‘अर्थपूर्ण’ शब्द बनतो.