प्रज्ञासिंहांवर खुनाचा जुना खटला चालणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 04:47 AM2019-05-22T04:47:28+5:302019-05-22T04:48:00+5:30
विधितज्ज्ञांचा सल्ला घेणार : मध्यप्रदेश सरकारचा निर्णय
भोपाळ : भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर निवडून येणार असल्याचा अंदाज जनमत चाचणीत (एक्झिट पोल) व्यक्त होताच मध्यप्रदेश सरकार त्यांच्याविरुद्धचा खुनाचा जुना खटला पुन्हा सुरू करण्याच्या विचारात आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार हा जुना खटला पुन्हा सुरू करण्याबाबत विधितज्ज्ञांचे मत जाणून घेईल, असे राज्याचे कायदामंत्री पी. सी. शर्मा यांनी सांगितले. माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी यांच्या खून खटल्यात प्रज्ञासिंह ठाकूर या निर्दोष सुटल्या आहेत. सुनील जोशी यांची २९ डिसेंबर, २००७ मध्ये देवास जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या झाली होती. २०१७ मध्ये न्यायालयाने ठाकूर आणि इतर सात आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते. हा खटला पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयात अर्ज करील, असे शर्मा म्हणाले. याप्रकरणी अहवाल सादर करण्यास देवासच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावर आम्ही कायद्याचे मत घेऊन त्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. शर्मा यांचा असा दावा आहे की, तेव्हाच्या जिल्हाधिकाºयांनी ते प्रकरण कायद्याचे मत घेण्यासाठी विधि विभागाकडे न पाठवता बंद करण्याचा स्वत:च निर्णय घेतला. उच्च न्यायालयात जाण्याची गरज नाही, असा निर्णय घेण्याऐवजी जिल्हाधिकाºयाने कायदा विभागाकडे अहवाल पाठवायला हवा होता, असे शर्मा म्हणाले.
हे तर सुडाचे राजकारण -भाजप
भोपाळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपच्या उमेदवार म्हणून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लढण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे राज्य सरकार त्यांच्याविरुद्धचा खटला पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत असल्याचे दिसते.
हे सुडाचे राजकारण आहे, असे भाजपचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी म्हटले. २००८ मधील मालेगाव स्फोट खटल्यात ठाकूर या आरोपी असून, त्यांना सध्या जामीन मंजूर झालेला आहे.