धोतर घातल्याने वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:03 AM2024-07-18T10:03:55+5:302024-07-18T10:05:53+5:30
मुलगा आणि वडील या मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. दोघांनी याचे तिकीटही काढले होते. मात्र जेव्हा ते मॉलच्या गेटजवळ पोहोचले तेव्हा सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाऊ देण्यास नकार दिला.
बेंगळुरू : येथील जीटी मॉलमध्ये भारताचा पारंपरिक पोशाख धोतर घालून गेल्याने एका वृद्धाला रोखण्यात आल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर शेतकरी संघटनांनी मॉलबाहेर आंदोलनही केले आहे.
मुलगा आणि वडील या मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. दोघांनी याचे तिकीटही काढले होते. मात्र जेव्हा ते मॉलच्या गेटजवळ पोहोचले तेव्हा सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाऊ देण्यास नकार दिला. धोतर घालून तुम्हाला मॉलमध्ये जाता येणार नाही, पॅन्ट घालावी लागेल, असे त्यांनी सांगितले. मी लांबून आलो आहे, त्यामुळे परत जाऊन कपडे बदलणे शक्य नाही, असे वडिलांनी सांगूनही सुरक्षा रक्षकाने त्यांचे ऐकले नाही. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉल प्रशासनाने माफी मागितली आहे.
मॉलमध्ये गेल्यानंतर सुरक्षा रक्षकाने सांगितले की, असा ड्रेस घालून कोणीही मॉलमध्ये जाऊ शकत नाही. मॉल व्यवस्थापनाने काही नियम केले आहेत, ज्यानुसार कोणीही असा पोशाख घालून मॉलमध्ये जाऊ शकत नाही. त्यानंतर धोतर परिधान केलेल्या वडिलांनी सुरक्षारक्षकाला समजवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की, ते लांबून आले आहेत, त्यामुळे परत जाऊन कपडे बदलणे शक्य नाही, असं या व्हिडीओत दिसत आहे.