१४ फूट लांब कोब्राला गळ्यात घालून करत होता डान्स, तेवढ्यात सापाने घेतला चावा आणि जागीच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 04:26 PM2021-10-07T16:26:08+5:302021-10-07T16:32:10+5:30
Assam News: धक्कादायक घटनेमध्ये आसाममधील कछार जिल्ह्यातील गावांमध्ये मोठ्या सापांचे प्रदर्शन करत असताना किंग कोब्राने चावा घेतल्याने एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला
गुवाहाटी - किंग कोब्रा सापाला गळ्यात घालून प्रदर्शन करणे एका वृद्धाच्या जीवावर बेतले आहे. एका धक्कादायक घटनेमध्ये आसाममधील कछार जिल्ह्यातील गावांमध्ये मोठ्या सापांचे प्रदर्शन करत असताना किंग कोब्राने चावा घेतल्याने एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना कछार जिल्ह्यातील विष्णुपूर गावात घडली आहे. (Old man dies of king cobra bite while dancing with him in Assam )
मृत व्यक्तीचे नाव रघुनंदन भूमिज असे आहे. याबाबत समोर आलेल्या वृत्तानुसार ६० वर्षीय रघुनंदन भूमिज यांनी गावातील भाताच्या शेतीमध्ये १४ फूट लांब किंग कोब्रा जातीचा साप पाहिला होता. त्यानंतर त्यांनी या सापाला पकडले. मग भूमीज यांनी हा साप गळ्यात घालून गावकऱ्यांसमोर त्याचे प्रदर्शन केले.
हा प्रकार अनेक ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती किंग कोब्राला गळ्यात घालून प्रदर्शन करताना दिसत आहे. त्यानंतर त्याने कोब्रासोबत नृत्य करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, त्याने सापाला चुकीच्या पद्धतीने पकडले होते. तसेच सापाला दंश करण्यासाठी प्रोत्साहित केले.
स्थानिक लोकांनी सांगितले की, सापासोबत डान्स करत असताना काही क्षणातच सापाने भूमिज यांना दंश केला. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि सापाला रेस्क्यू करून जंगलात सोडले.