विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS कोचिंग सेंटरवर कारवाई; बेसमेंटमध्ये सुरू वर्ग सील...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 08:59 PM2024-07-29T20:59:52+5:302024-07-29T21:00:40+5:30
दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर येथील एका आयएएस कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे.
Old Rajendra Nagar Accident :दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर येथील एका आयएएस कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर एमसीडी(दिल्ली महानगरपालिका) ॲक्शन मोडमध्ये आली आहे. या दुर्घटनेनंतर एमसीडी कमिशनरने स्पष्टपणे सांगितले होते की, जिथे जिथे बेकायदा बेसमेंट आहेत, तिथे कारवाई केली जाईल. त्यांच्या आदेशानुसार, अनेक कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली असून, यात विकास दिव्यकीर्ती यांचे प्रसिद्ध दृष्टी IAS (व्हिजन) कोचिंग सेंटरचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू विहारच्या वर्धमान मॉलच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेले दृष्टी (व्हिजन) कोचिंग सेंटर सील करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले की, या बेसमेंटमध्ये पाच वेगवेगळे वर्ग सुरू होते आणि एका बॅचमध्ये 600-700 विद्यार्थी शिकतात. आता प्रशासनाने हे बेसमेंट सील केले आहे. दृष्टीसोबतच, आयएएस गुरुकुल, चहल अकादमी, प्लूटस अकादमी साई ट्रेडिंग, आयएएस सेतू, टॉपर्स अकादमी, दैनिक संवाद, सिव्हिल्सडेली आयएएस, करिअर पॉवर, 99 नोट्स, विद्या गुरू, गायडेन्स आयएएस, आयएएस के लिए आसान आणि एसे फॉर आयएएस या कोचिंग सेंटरवरदेखील कारवाई केली आहे.
आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
ओल्ड राजेंद्र नगरमध्ये तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली न्यायालयाने सोमवारी (29 जुलै) पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या पाच आरोपींमध्ये चार कोचिंगचे सहमालक आणि एका चालकाचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थ्यांनी सोमवारी निदर्शने केली. यावेळी पोलिस आणि प्रशासनाने विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हा मुद्दा संसदेतही मांडण्यात आला. लोकसभेत विविध पक्षांच्या सदस्यांनी चौकशीची मागणी केली. राज्यसभेतही खासदारांनी या विषयावर आपली मते मांडली.
नेमकी घटना काय ?
राजेंद्र नगर परिसरात 'राव IAS' नावाने कोचिंग सेंटर चालवले जाते. या कोचिंग सेंटरने बेकायदेशीररित्या इमारतीच्या तळघरात लायब्ररीची सुविधा केली होती. शनिवारी रात्री दिल्लीमध्ये जोरदार पाऊस पडला, ज्यामुळे या लायब्ररीत अचानक पाण्याचा लोंढा आला. या पाण्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.