लोकसभेत धार्मिक घोषणाबाजी चालू देणार नाही : लोकसभा अध्यक्ष बिर्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 10:28 AM2019-06-21T10:28:17+5:302019-06-21T10:28:17+5:30
याआधी संसदेत धार्मिक घोषणा देण्यासंदर्भात पहिल्यांदाच लोकसभेत गेलेल्या नवनीत कौर राणा यांनी आपले मत मांडले. संसदेत जय श्री रामच्या घोषणा देणे योग्य नसल्याचे राणा यांनी म्हटले होते.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान झाला आहे. त्यानंतर ठरल्याप्रमाणे भाजपसह सर्व लोकसभा सदस्यांनी लोकसभेत सदस्यपदाची शपथ घेतली. मात्र हा शपथविधी धार्मिक नारेबाजीमुळे चांगलाच गाजला आहे. त्यावर भाजपकडून नियुक्त करण्यात आलेले नवे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला आहे.
नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी कार्यक्रमात एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी शपथ घेत असताना भाजपच्या काही नेत्यांकडून 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यात आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना ओवेसी यांनी देखील 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा दिल्या. त्यामुळे लोकसभेला धार्मिक आखाड्याचे रुप येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यावर लोकसभा अध्यक्ष बिर्ला म्हणाले की, माझ्या मते संसद भवन धार्मिक नारेबाजी करण्याचं ठिकाण नक्कीच नाही किंवा प्लेकार्ड दाखवणे आणि वेलमध्ये यायचं, असही ठिकाण नाही. घोषणाबाजी करण्यासाठी एक विशिष्ठ ठिकाणं आहेत. तिथे जावून तुम्ही प्रदर्शन करू शकता, किंवा घोषणाबाजी करू शकता. उपस्थित सदस्य सरकारवर टीका करू शकतात. परंतु, लोकसभेत गॅलरीत येऊन घोषणाबाजी करणे योग्य नसल्याचे बिर्ला यांनी नमूद केले.
दरम्यान संसदेत धार्मिक घोषणाबाजी होणार नाही अस आश्वासन तुम्ही देऊ शकतात का, असा प्रश्न बिर्ला यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मला ठावूक नाही, भविष्यात पुन्हा असं काही घडेल. मात्र मी नियमानुसार संसदेचे कामकाज पार पाडणार आहे. सर्वच पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. अशा परिस्थितीत त्यांचा विश्वास कायम राखणे माझ कर्तव्य असल्याचे बिर्ला म्हणाले.
याआधी संसदेत धार्मिक घोषणा देण्यासंदर्भात पहिल्यांदाच लोकसभेत गेलेल्या नवनीत कौर राणा यांनी आपले मत मांडले. संसदेत जय श्री रामच्या घोषणा देणे योग्य नसल्याचे राणा यांनी म्हटले होते.