"तो मुलीला ड्रग्ज द्यायचा आणि..."; पोलीस अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या पत्नीचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:03 IST2025-04-22T14:59:45+5:302025-04-22T15:03:54+5:30
कर्नाटकात माजी पोलीस अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणात आरोपी पत्नीने मोठा खुलासा केला आहे.

"तो मुलीला ड्रग्ज द्यायचा आणि..."; पोलीस अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या पत्नीचा मोठा खुलासा
Karnataka DGP Murder:कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांचा रविवारी बंगळुरूमधील एचएसआर लेआउट येथील त्यांच्या निवासस्थानी मृत्यू झाला होता. ६८ वर्षीय ओम प्रकाश यांचा मृतदेह त्यांच्या तीन मजली घराच्या तळमजल्यावर रक्ताने माखलेला आढळला होता. त्यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या, पोलिसांनी याप्रकरणी त्यांची पत्नी पल्लवी हिला अटक केली आहे. पल्लवीने जेवणाच्या ताटावरच ओम प्रकाश यांचा चाकूने भोकसून खून केला आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर आता पल्लवीने ओम प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पल्लवीने आधी ओम प्रकाश यांच्यावर मिरची पावडर फेकली. जेव्हा ते जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते तेव्हा पल्लवीने त्यांच्या मानेवर, पोटावर आणि छातीवर १०-१२ वेळा चाकूने वार केले. पोलिसांच्या वृत्तानुसार, पल्लवीने गुन्हा कबूल केला आहे. या घटनेच्या वेळी मुलगी कृती देखील तिथे उपस्थित होती. हत्येनंतर पल्लवीने दुसऱ्या आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला राक्षसाला ठार केले असा मेसेज पाठवला. त्यानंतर पल्लवीने त्यांना फोन करून सांगितले की तिने ओम प्रकाशचा खून केला आहे.
त्यानंतर आता पल्लवीने ओम प्रकाश यांच्याबाबत अनेक दावे केले आहेत. ओम प्रकाश त्याच्या मुलीला ड्रग्ज देत होते. तसेच, त्याच्या जेवणात सॅनिटायझर मिसळल्याचा आरोपही करण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अटक झाल्यानंतर पल्लवीने आरोप केला आहे की ओम प्रकाश कृतीला ड्रग्ज देत होता. "त्याने आता मुलीला ड्रग्ज देण्यास सुरुवात केली होती जी तिच्या मेंदूवर परिणाम करत होते. हे फक्त त्याने त्याच्याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली म्हणून केले. माझी मुलगी दररोज मरत आहे. ती अतिशय धोकादायक परिस्थितीत आहे आणि तिला लगेच मदतीची गरज आहे. मुलीचा फोन, लॅपटॉप आणि सर्व हॅक केली आहेत. माझ्याकडे पुराव्यांची कमी नाही," असे पल्लवीने म्हटलं.
"ओम प्रकाशने मालमत्तेसाठी हे सर्व केले होते. माझा नवरा इतरांना मानसिकदृष्ट्या अस्थिर घोषित करून त्याचे काम करत होता. ही सर्व कामे मालमत्तेच्या वादातून झाले. माझा नवरा माझ्या मुलाची आणि सुनेची बाजू घेतो. मी त्याला वर्षानुवर्षे वेगळे होण्यास सांगत आहे, पण काहीही होत नाहीये. मी जिथे जिथे एकटी जाते तिथे तो माझ्या खाण्यापिण्यात विष मिसळायला सुरुवात करतो. विष देण्यासाठी घरातील कर्मचाऱ्यांनाही लाच दिली होती. माझी मुलगी खूप त्रास सहन करत आहे. मी शांत बसू शकत नाही," असे पल्लवीने एका मेसेजमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान, ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेय याच्या तक्रारीनंतर, त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलगी कृती यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. "आई पल्लवी गेल्या एका आठवड्यापासून वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत होती. या धमक्यांमुळे माझे वडील त्यांच्या बहिणीच्या घरी राहायला गेले होते. दोन दिवसांपूर्वी माझी धाकटी बहीण कृती तिथे गेली आणि तिने माझ्या वडिलांना घरी परतण्यासाठी दबाव आणला. तिने त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध परत आणले," असे मुलाने आपल्या तक्रारीत म्हटले.