ओमायक्रॉनमुळे बँकिंग क्षेत्रापुढे आव्हान- इक्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 12:17 PM2022-01-12T12:17:01+5:302022-01-12T12:20:02+5:30
कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लादले गेल्यास त्याचा थेट परिणाम बँकांवर होणार आहे.
नवी दिल्ली : ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेमुळे बँकिंग क्षेत्रापुढे पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. बँकांच्या पत मालमत्तेची गुणवत्ता बाधित होण्यासह कर्ज पुनर्रचनेच्या प्रक्रियेला बाधा येण्याची चिंता पतमानांकन संस्था इक्राने व्यक्त केली आहे.
कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लादले गेल्यास त्याचा थेट परिणाम बँकांवर होणार आहे. बुडीत कर्जात वाढ होण्यासह सार्वजनिक, तसेच खासगी क्षेत्रातील बँकांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे. बँकांकडे येणाऱ्या कर्ज पुनर्रचनेच्या प्रस्तावांमध्येही १५ ते २० टक्के वाढ अपेक्षित असल्याचे इक्राचे उपाध्यक्ष अनिल गुप्ता यांनी म्हटले आहे.
बुडीत कर्जांचे प्रमाण वाढणार
रिझर्व्ह बँकेनेही बुडीत कर्जांचे प्रमाण सप्टेंबर २०२२ पर्यंत ८.१ टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. कोरोना परिस्थिती आणखी बिघडली तर हे प्रमाण ९.५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे.