BJP-PDP घटस्फोटावर ओमर अब्दुल्लांची टीका, वादग्रस्त फिल्मचा सीन केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 01:53 PM2018-06-21T13:53:13+5:302018-06-21T13:55:50+5:30
भाजपा आणि पीडीपी यांच्यातील युतीवर टीका करत राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका वादग्रस्त चित्रपटातील काहीसा भाग आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील भाजपा आणि पीडीपीचे सरकार कोसळल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. गेल्या मंगळवारी भाजपाने पाठिंबा काढल्यामुळे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार पडले. राज्यात आता राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपा आणि पीडीपी यांच्यातील युतीवर टीका करत राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका वादग्रस्त चित्रपटातील काहीसा भाग आहे.
व्हिडीओ शेअर करत ओमर अब्दुल्ला यांनी लिहिले आहे की, पीडीपी आणि भाजपा आपली राजकीय रणनिती बनविण्यासाठी बॉलिवूड चित्रपट पाहत होती. त्यांनी आपला घटस्फोट या पद्धतीने दिला. एक शानदार फिक्स स्क्रिप्ट तयार केली होती. मात्र, जनता आणि आम्ही सारे मुर्ख नाही आहोत की ते समजणार नाही. त्यांना हे समजायला पाहिजे.
The PDP & BJP have been watching Bollywood movies for political strategy. This is how they have crafted their “divorce”. Brilliant fixed match, scripted to perfection except the audience aren’t fools & neither are the rest of us 😀 pic.twitter.com/82854aFHWM
— Omar Abdullah (@OmarAbdullah) June 20, 2018
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्याने मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार मंगळवारी कोसळले. भाजपाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर येथील विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा यांनी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. या शिफारशीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.